सरपंच, सदस्यांसह ग्रामस्तर समितीचे लसीकरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:25 AM2021-06-23T04:25:43+5:302021-06-23T04:25:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्तरीय कमिटीवर फ्रंटलाईन वर्कर म्हणून जबाबदारी टाकण्यात आल्याने त्यांचे प्रथम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्तरीय कमिटीवर फ्रंटलाईन वर्कर म्हणून जबाबदारी टाकण्यात आल्याने त्यांचे प्रथम कोरोना लसीकरण करावे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची बिले जिल्हा परिषदेमार्फत भरण्यात यावीत आदी मागण्यांचे निवेदन सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्रच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
सातारा जिल्हा परिषद येथे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना हे निवेदन देण्यात आले. या वेळी सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील, कार्याध्यक्ष आनंदराव जाधव, उपाध्यक्ष अरुण कापसे, सचिव शत्रुघ्न धनवडे, समाधान पोफळे, संजय शेलार, चंद्रकांत सणस, महेश गाडे, अनिल सोनमळे, हणमंत देवरे, अमोल गोगावले आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद अध्यक्षांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र ही कोरोना संकटाच्या काळात प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. परिषदेने आतापर्यंत राज्यभरात कोरोनाग्रस्तांसाठी १० लाखांची मदत केली आहे. तर शासनाकडे सरपंच, उपसरपंच, सदस्यांना विमा संरक्षण मिळावे, मृत्यू झालेल्या सरपंचाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशा मागण्याही केलेल्या आहेत. तर जिल्हास्तरावर आता सरपंच, उपसरपंच, सदस्यांचे कोरोना लसीकरण प्राधान्याने होण्यासाठी सूचना करावी, अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर १४ वा वित्त आयोग व्याज रक्कम जिल्हा परिषदेने पुन्हा ग्रामपंचायतीस वर्ग करावी, ग्रामपंचायतीत संगणक चालक आहेत. त्यांचा पगार ग्रामपंचायतीमार्फत अदा करण्याबाबत जिल्हा परिषदेने मंजुरी द्यावी. जिल्हा परिषद शेष फंडातून विलगीकरण कक्षासाठी लागणारा निधी आणि साहित्य उपलब्ध करुन द्यावे. सरपंच, उपसरपंच, ग्रामस्तरीय समितीला ओखळपत्र मिळावे, अशाही आमच्या मागण्या आहेत. या मागण्यांचा विचार करण्यात यावा.
......................................................................