कुडाळ : जावळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतांश ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर सरपंचपदाच्या आरक्षणाचे वेध लागले होते. शुक्रवारी जावळीतील १२५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत मेढा येथील पंचायत समितीच्या सभागृहात परिवीक्षाधीन जिल्हाधिकारी तथा तहसीलदार मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली.
यावेळी सभापती जयश्री गिरी, उपसभापती सौरभ शिंदे, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे उपस्थित होते. तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे असणाऱ्या कुडाळच्या सरपंचपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी जाहीर झाले आहे, तर सरताळे, सर्जापूर, बामणोली तर्फ कुडाळ, हुमगाव, करहर, केळघर, महिगाव या ठिकाणी सर्वसाधारण महिलांसाठी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. बेलावडे, वालुथ या ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आणि म्हसवे, सोनगाव, पवारवाडी, आर्डे याठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर केले आहे.
तालुक्यातील एकशेपंचवीस ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी पाच ग्रामपंचायती तर अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी चार ठिकाणी आरक्षण आहे. अनुसूचित जमातीच्या महिला सरपंच प्रवर्गासाठी एक जागा आणि नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला प्रवर्गासाठी १७ ग्रामपंचायतीत आरक्षण जाहीर झाले आहे. याचबरोबर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित केलेल्या ग्रामपंचायती एकूण सतरा असून, सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी ४० व सर्वसाधारण प्रवर्ग यासाठी ४० ग्रामपंचायतीत आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.
याठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.