Satara- पाडळीतील मानाच्या सासनकाठीचे वाडी रत्नागिरीकडे रविवारी होणार प्रस्थान
By दीपक शिंदे | Published: March 31, 2023 06:41 PM2023-03-31T18:41:21+5:302023-03-31T18:41:43+5:30
छबिना सोहळा झाल्यानंतर काठीला तोफांची सलामी दिली जाईल व त्यानंतर सासनकाठीचा परतीचा प्रवास
नागठाणे : वाडी रत्नागिरी येथील जोतिर्लिंग देवाचे भव्य यात्रेनिमित्त पाडळी येथील मानाच्या सासनकाठीचे रविवार, दि. २ एप्रिल रोजी वाडी रत्नागिरीकडे प्रस्थान होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे,’ अशी माहिती देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात आली आहे.
वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिर्लिंग हे राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. दरवर्षी चैत्रात येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या मिरवणूक सोहळ्यात राज्यातील विविध मानाच्या सासनकाठ्या सहभागी होत असतात. त्यात पाडळी येथील मानाच्या सासनकाठीला मानाचे अग्रस्थान असते.
यंदा बुधवार, दि. ५ एप्रिल रोजी वाडी रत्नागिरी येथे ज्योतिबा देवाची यात्रा होणार आहे. त्या यात्रेत सहभागी होण्यासाठी पाडळी येथील सासनकाठीचे रविवारी सकाळी सहा ते साडेदहा या वेळेत पावक्ताच्या माळावरून प्रस्थान होणार आहे.
त्यानंतर ही सासनकाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांसोबत पाली, इंदोली, कासेगाव, किणी वाठार, ऐतवडे, केखले या मार्गाने वाडी रत्नागिरीकडे पोहोचणार आहे. छबिना सोहळा झाल्यानंतर गुरुवारी काठीला तोफांची सलामी दिली जाईल व त्यानंतर सासनकाठीचा परतीचा प्रवास सुरू होऊन सासनकाठी गावाकडे परतेल.
यादरम्यान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी आरती होणार आहे, अशी माहिती यात्रा कमिटीकडून देण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी सासनकाठीचे पाडळी येथे आगमन होणार आहे. दरम्यान सासनकाठीचे प्रस्थान व आगमन यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ज्योतिर्लिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.