Satara: सराफाचे अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न, चार जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 08:58 PM2023-04-03T20:58:30+5:302023-04-03T20:59:00+5:30

Crime News: सातारा शहरातील एका सराफाला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील बॅग चोरून नेणाऱ्या चाैघांना अटक करण्यात शाहूपुरी पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले.

Satara: Attempt to kidnap Sarafa and demand ransom, four people handcuffed by police | Satara: सराफाचे अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न, चार जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Satara: सराफाचे अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न, चार जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

googlenewsNext

 सातारा : शहरातील एका सराफाला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील बॅग चोरून नेणाऱ्या चाैघांना अटक करण्यात शाहूपुरी पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले. केवळ सोन्याचा ऐवजच नव्हे तर सराफाचे कारमधून अपहरण करून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचा डाव या चाैघांचा होता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

केडी उर्फ अर्जुन कुंदन इंगळे (वय १९, रा. यशवंतनगर, सैदापूर, ता. सातारा. मूळ रा. अंबवडे खुर्द, ता. सातारा), अर्जुन दाैलत पवार (वय १९, रा. सैदापूर, मूळ रा. नामदेववाडी, झोपडपट्टी, सातारा), रोहित शिवाजी जाधव (वय १९, रा. यशवंतनगर, सैदापूर), विकास बाळासाहेब गोसावी (वय ३२, रा. यशवंतनगर, सैदापूर, मूळ रा. रविवार पेठ, गोसावी गल्ली, सांगली) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.              

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील एक सराफ व्यावसायिक व त्यांचा कामगार १९ मार्च रोजी रात्री साडेनऊला घरी निघाले होते. त्यावेळी शाहूपुरी परिसरातील एका शाळेसमोर कारमधून चाैघेजण आले. त्यांनी कार आडवी मारून सराफाला व कामगाराला थांबवले. चाकूचा धाक दाखवून सराफाकडील बॅग हिसकावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी त्यांची झटापट झाली. दोघांकडून कडवा विरोध होत असल्याचे पाहून सराफाची बॅग हिसकावून चोरट्यांनी घाईगडबडीत पलायन केले. मात्र, सुदैवाने बॅगमध्ये काहीच नव्हते. केवळ दुकानाच्या चाव्या होत्या. या प्रकारानंतर संबंधित सराफाने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.

पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरणच्या टीमने सुरू केला. तांत्रिक आणि खबऱ्यांकडून माहिती काढून पोलिस अखेर दरोडेखोरांपर्यंत पोहोचलेच. संशयित चाैघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी मोबाइल, कार जप्त केली. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चाैकशी केली असता या सर्वांनी सराफाचे अपहरण करण्याचा कट रचला होता. मात्र, सराफाने विरोध केल्याने हे सर्वजण भांबावून गेले. त्यामुळे अपहरणाचा बेत रद्द करून त्यांनी केवळ सराफाकडील बॅग घेऊन पलायन केले, अशी कबुली त्यांनी दिली.

पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, पोलिस उपनिरीक्षक अश्विनी वाघमारे, हवालदार लैलेश फडतरे, सचिन माने, अमित माने, धनंजय कुंभार, स्वप्नील कुंभार, संतोष इष्टे, मिथून मोरे, ओंकार यादव, सचिन पवार, दत्तात्रय पाटोळे, धनाजी घाडगे, प्रवीण वायदंडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. 

Web Title: Satara: Attempt to kidnap Sarafa and demand ransom, four people handcuffed by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.