फलटण : जिल्ह्यात विनापरवाना वाळू व गौण खनिजाचे उत्खनन करुन त्यांची राजरोसपणे वाहतूक केली जाते. वाळूतस्करांवर वचक बसविण्यासाठी महसूल विभाग रात्रंदिवस कारवाई करतो. अशाच जप्त केलेले वाळू व मुरुमाचा लिलाव करण्याचा निर्णय फलटण तहसील कार्यालयाने घेतला आहे.
फलटण तहसील कार्यालयाने अनधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये ४७५ ब्रास वाळू व ५६ ब्रास मुरूम जप्त केला आहे. यांचा जाहीर लिलाव शुक्रवार, दि. १६ रोजी सकाळी अकरा करण्यात येणार आहे, अशी माहिती फलटण तहसीलदार विजय पाटील यांनी दिली आहे.
जप्त केलेल्या वाळूची किंमत प्रति ब्रास ४ हजार ४६ रुपये असून मुरूमाची प्रति ब्रास किंमत सातशे रुपये निश्चित करण्यात आली आहे. याचबरोबर लिलावाच्या दिवशी शुक्रवार, दि. १६ रोजी जप्त केलेला वाळू तसेच मुरूम साठा लिलावामध्ये न गेल्यास शनिवार, दि. १७ रोजी लिलावाची दुसरी फेरी घेण्यात येणार आहे. सदर दिवशीही लिलाव न गेल्यास लिलावाची तिसरी फेरी फलटण तहसील कार्यालयाच्या आवारात घेण्यात येणार आहे.