सातारा : आधी बुंध्यात निखारे.. आता झाडच गायब !, विघ्नसंतोषींचा उपद्रव सुरूच : पुरावा लपविण्यासाठी खोडावर पालापाचोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:50 PM2018-02-26T12:50:16+5:302018-02-26T12:50:16+5:30
कास पठार परिसरात अज्ञातांकडून वणवे लावण्याच्या घटना वाढत असताना काही दिवसांपूर्वी हिरव्यागार झाडाच्या बुंध्यातच निखारे टाकून झाड पाडण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला. अज्ञातांनी आता हे झाडचं गायब केले असून, पुरावा लपविण्यासाठी झाडाच्या खोडावर चक्क पालापाचोळ्याचा ढीग पसरविण्यात आला आहे.
पेट्री : कास पठार परिसरात अज्ञातांकडून वणवे लावण्याच्या घटना वाढत असताना काही दिवसांपूर्वी हिरव्यागार झाडाच्या बुंध्यातच निखारे टाकून झाड पाडण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला. अज्ञातांनी आता हे झाडचं गायब केले असून, पुरावा लपविण्यासाठी झाडाच्या खोडावर चक्क पालापाचोळ्याचा ढीग पसरविण्यात आला आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून सातारा-कास मार्गावर ठिकठिकाणी वणवे लावण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले जाऊ लागले आहे. मागील आठवड्यात अंबानी ते पारंबेफाटा दरम्यान देवकल फाट्यानजिक मोठमोठ्या झाडांचे बुंधेच निखारे टाकून पेटविण्यात आले होते. हिरवीगार झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडू लागल्याने पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, गेल्या आठवड्यात पारंबेफाटा नजिक जाळण्यात आलेले हिरवेगार झाडचं आता अज्ञातांकडून गायब करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. झाड जळून खाली पडल्यानंतर ते गायब करण्याबरोबरच अज्ञातांकडून पुरावा नष्ट करण्यासाठी झाडाच्या खोडावर चक्क पालापाचोळा टाकण्यात आला आहे.
या घटना रोखण्यासाठी वेळीच कठोर पाऊले उचलली गेली नाही तर येथील निसर्गसौंदर्याचा ऱ्हास होईल, अशी खंत व्यक्त करून अशा प्रकारचे अमानुष कृत्य करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.
वणव्यांमुळे प्राणीसंपदा, वनसंपदा धोक्यात आल असून, पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. कित्येक पशुपक्ष्यांच्या निवाऱ्यांचा प्रश्न निर्माण होत आहे. वृक्षांची कत्तल करणाऱ्या विघ्नसंतोषींवर वनविभागाने कठोर कारवाई करावी.
- ओंकार मोहिते,
पर्यावरणप्रेमी