फलटण : शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून, भर वस्तीत स्वामी विवेकानंदनगर भागात गायीच्या वासरावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे.
फलटण शहरात मोकाट कुत्री, डुकरे व जनावरांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ठिकठिकाणी ही कुत्री डुकरांची पिल्ले, गायीची वासरं व लहान बकरी यांच्यावर हल्ला करताना दिसतात. दुचाकीस्वारांच्या गाडीमागे लागणे, रात्रीचे चालत जाणाऱ्या व्यक्तींवरही हल्ला करतात.
मोकाट जनावरांमधील काही गायी मारक्या असून, मंडई परिसरात या जनावरांचा लहान मुले, स्त्रिया व वृद्धांना त्रास होतो, तर काही जखमी होतात. या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीचीही कोंडी होते. अशी मोकाट कुत्री व जनावरांवर नगरपालिकेने पायबंद घालावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.