Satara: मालट्रकमधील पोती कारवर पडल्याने कारमधील मुलाचा मृत्यू, चार जखमी
By दत्ता यादव | Published: May 22, 2023 10:14 PM2023-05-22T22:14:58+5:302023-05-22T22:19:31+5:30
Accident: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काशीळ, ता. सातारा गावच्या हद्दीत चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये मालट्रक उलटून त्यातील चण्याची पोती कारवर पडल्याने त्याखाली सापडून एका १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
- दत्ता यादव
सातारा - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काशीळ, ता. सातारा गावच्या हद्दीत चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये मालट्रक उलटून त्यातील चण्याची पोती कारवर पडल्याने त्याखाली सापडून एका १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री अकराच्या सुमारास झाला.
अपूर्व संतोष जाधव (वय १४, रा. भणंग, ता. जावळी, जि. सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भणंग येथील जाधव आणि पवार कुटुंबीय सुटीसाठी कोकणात फिरण्यासाठी गेले होते. रविवारी रात्री कारने हे कुटुंबीय परत यायला निघाले. काशीळ गावच्या हद्दीत त्यांची कार आली. त्यावेळी त्यांच्या समोर असलेल्या मालट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे दुभाजकाला धडकून मालट्रक उलटला. परंतु मालट्रकमध्ये असलेली चण्याची पोती पाठीमागून येत असलेल्या कारवर पडली. यात चालकाच्या पाठीमागे बसलेला अपूर्व जाधव हा त्याखाली सापडला. या अपघातानंतर बोरगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कारमधून बाहेर काढले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अपूर्वचा मृत्यू झाला. तर इतर चार जणांना किरकोळ स्वरूपाची जखम झाली. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. या अपघाताची बोरगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
असा झाला अपघात
मालट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर तो दुभाजकाला धडकला. तेव्हा दुसऱ्या आयशर टेम्पोची ट्रकला धडक बसली. याचवेळी पाठीमागून आलेल्या दोन कारही धडकल्या. यामध्ये दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.