सातारा : पहाटे थंडी, दुपारी उकाडा, फेब्रुवारीतच कमाल तापमान ३५ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:27 PM2018-02-27T14:27:43+5:302018-02-27T14:27:43+5:30
गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यातील कमाल तापमानात सतत वाढ होत असून फेब्रुवारीतच ३५ अंशाचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे किमान तापमानात घट झाल्याने पहाटेच्या सुमारास थंडी जाणवत आहे. सतत बदलत असणाऱ्या अशा वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकल्याने आजारी पडण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.
सातारा : गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यातील कमाल तापमानात सतत वाढ होत असून फेब्रुवारीतच ३५ अंशाचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे किमान तापमानात घट झाल्याने पहाटेच्या सुमारास थंडी जाणवत आहे. सतत बदलत असणाऱ्या अशा वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकल्याने आजारी पडण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात थंडी जाणवत आहे. डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून तर किमान तापमान ११ ते १५ अंशाच्या दरम्यान होते. तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किमान तापमान ९ अंशांपर्यंत खाली आले होते. हे तापमान दोन वर्षांतील निच्चांकी ठरले होते.
त्यानंतर संक्रातीच्या दरम्यान, किमान तापमानात तसेच कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचे चटके जाणवू लागले होते. जानेवारी महिन्यातच कमाल तापमान ३० अंशांच्यावर गेले व बरेच दिवस ते स्थिर होते.
फेब्रुवारी महिन्यापासून तर किमान आणि कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊ लागली. कमाल तापमान ३० च्यावर जाऊ लागले. तर किमान तापमानात वाढ होऊन ते १८ अंशापर्यंत पोहोचले. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे.
किमान तापमान १५ अंशावरुन १७ अंशापर्यंत पोहोचले तसेच त्यात उतारही आला. सध्या साताऱ्यांतील किमान तापमान १७.०७ अंशावरुन १४.०७ पर्यंत खाली आले आहेत. तर दुसरीकडे कमाल तापमान ३३ अंशावरुन ३५ च्या पुढे गेले. त्यामुळे दिवसा उकाडा आणि पहाटे थंडी जाणवत आहे.
अशा सतत बदलत जाणाऱ्या वातावरणामुळे थंडी, ताप, खोकला अशा आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गावोगावच्या रुग्णालयातही उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
तापमान किमान कमाल
दि. २० १५.०५ ३३.०८
दि. २१ १६.०० ३४.०२
दि. २२ १६.०१ ३३.०६
दि. २३ १७.०० ३४.०१
दि. २४ १७.०७ ३३.०६
दि. २५ १५.०५ ३४.०२
दि. २६ १३.०५ ३५.०१
दि. २७ १४.०७ ..........