सातारा : कटलेल्या पतंगांचा पाठलाग करणे, छतावर गेलेला चेंडू काढताना अपघात झालेल्या घटना सातारा जिल्ह्यात अनेकदा घडल्या आहेत. दुर्घटना झाल्यानंतर पालकांच्या काळजाचा ठोका चुकतो. अवघ्या दहा रुपयांच्या खेळण्यातल्या पंख्यासाठी एक मुलगा शाळेच्या कौलावर चढल्याची घटना घडली. विशेष म्हणजे त्यांच्या जीवघेण्या खेळाकडे कोणाचेही लक्ष नव्हते.मुलांना कधी काय खेळ सुचेल, याचा नेम नाही. पतंग उडविण्यासाठी अनेक मुलं घराचे छत, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढतात. तर काही मुलांना पतंग उडविण्यासाठी इतरांनी कटलेल्या पतंगाचा पाठलाग करून पकडणे अन् त्यांचा संग्रह करण्याचा जणू छंदच लागलेला असतो. पतंगाचा पाठलाग करताना घराचे छत किंवा इतर ठिकाणच्या उंचावरून पडल्याने अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत.साताऱ्यातील राजवाडा परिसरात ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर ही नगरपालिकेची दोन नंबरची शाळा आहे. शाळेच्या प्रांगणात मुलं खेळत असताना खेळण्यातील पंखावर छतावर पडला. काही काळ मुलांनी काठीच्या साह्याने काढण्याचा प्रयत्न केला; पण तो निष्फळ ठरल्यानंतर एक मुलगा छतावर चढला.शाळेला कौलं असल्यामुळे तीव्र उतार होता. या कौलावरून तो मुलगा हळूहळू सरकत सरकत शेवटच्या टोकावर आला अन् तो पंखा घेऊनच मुलगा खाली आला.
एक मुलगा छतावर जाऊन जीव धोक्यात घालून कौलाच्या शेवटच्या टोकावर आला; पण त्याची शाळा अन् परिसरातील नागरिकांना पुसटशीही माहिती नव्हती, हे विशेष. मुलं वर जाणारच नाही, यासाठी शाळांनीही काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.