सातारा : कालेच्या मुधाई डेअरीत दुर्घटना, स्टरलायझर मशीन आॅपरेटर्सचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 04:15 PM2018-10-22T16:15:49+5:302018-10-22T16:18:07+5:30
दूध डेअरीत स्टरलायझर मशीन व्यवस्थित बंद न झाल्याने मशीनचा दरवाजा अचानक उघडून आॅपरेटरचा मृत्यू झाला. काले- पाचवड फाटा, ता. कऱ्हाड येथील मुधाई दूध डेअरीत सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
कऱ्हाड : दूध डेअरीत स्टरलायझर मशीन व्यवस्थित बंद न झाल्याने मशीनचा दरवाजा अचानक उघडून आॅपरेटरचा मृत्यू झाला. काले- पाचवड फाटा, ता. कऱ्हाड येथील मुधाई दूध डेअरीत सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. उमेशकुमार हिंगुराव यादव (वय २८ मूळ रा. भदोली, रविधारानगर, उत्तरप्रदेश. सध्या रा. कालेटेक, ता. कऱ्हाड ) असे मृत आॅपरेटरचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कालेगावच्या हद्दीत पाचवडफाटा येथे मुधाई दूध डेअरी आहे. या डेअरीत परिसरातील गावातील संकलित केलेले दूध आणले जाते. तसेच दुधाचे वेगवेगळे फ्लेवर तयार करून ते दूध सातारासह इतर जिल्ह्यांत वितरित केले जाते. सोमवारी सकाळीही डेअरीत दूध संकलन करण्यात आले. त्यानंतर महिला कामगारांनी काचेच्या बाटल्यांमध्ये वेगवेगळे फ्लेवर टाकून सुगंधी दूध तयार केले.
दुधाने भरलेल्या या बाटल्या विशिष्ट तापमानास गरम करण्यासाठी स्टरलायझर मशीनमध्ये ठेवण्यात येतात. त्याप्रमाणे मशीन आॅपरेटर उमेश कुमार यादव याने दुधाने भरलेल्या बाटल्यांचे ट्रे मशीनमध्ये ठेवले. दूध गरम होण्यासाठी त्याने मशीनचा दरवाजा बंद केला. मात्र, दरवाजा व्यवस्थित बंद झाला नसावा.
परिणामी काही वेळातच दाब वाढून अचानक मशीनचा दरवाजा मोठ्या दबावाने उघडला गेला. या लोखंडी दरवाजाचा दणका उमेशकुमारला बसल्यामुळे तो जागीच ठार झाला.
घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आला.