नितीन काळेलसातारा : आजपावेतो अनेक वर्षे एकमेकांना पाण्यात पाहणारी नेतेमंडळी जेव्हा हसतखेळत गप्पा मारू लागतात, शुभेच्छा देऊ लागतात... तेव्हा सर्वसामान्य जनतेला समजतं की कुछ तो गडबड है!
कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन हॅपी बर्थडे म्हटले. त्यामुळे ही राजकीय जवळीकता पाहता सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील राजकारणाला कलाटणी मिळणार असल्याचेच दिसत आहे.पूर्वी सातारा आणि जावळी हे वेगवेगळे विधानसभा मतदारसंघ होते. २००९ ला विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि सातारा-जावळी हा नवा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आतापर्यंत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
२०१४ च्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार हे उभे होते. त्यावेळी आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडल्या होत्या. तसे पाहता आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि दीपक पवार यांच्यात राजकीय शत्रुत्व कायम आहे.
आतापर्यंत खासदार उदयनराजे भोसले हे मनोमिलनामुळे शांत होते. त्यामुळे त्यांची ताकद ही शिवेंद्रसिंहराजेंना मिळत होती; पण २०१६ मध्ये नगरपालिका निवडणूक झाली. या निवडणुकीत सातारा पालिकेतील मनोमिलनाचा फुगा फुटला. त्यामुळे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात टोकाची दरी निर्माण झाली.
परिणामी राजकारणात कोण कोणाचा मित्र नसतो तसेच शत्रूही असत नाही, याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. कारण, विरोधक असणारे खासदार उदयनराजे आणि दीपक पवार हे एकत्र येत असल्याचे चित्र आहे. हे आगामी राजकीय चित्र बदलणार असल्याचे द्योतक आहे.
छत्रपती असल्याने खासदार उदयनराजे भोसले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यापूर्वीही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यामध्ये राजकारण काही नाही.- दीपक पवार,भाजप