सातारा जिल्ह्यातील साडे तीन हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 06:38 PM2018-02-05T18:38:24+5:302018-02-05T18:42:23+5:30
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता तपासण्याची परीक्षा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ८० शाळांतून सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाणार आहे.
सातारा : राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता तपासण्याची परीक्षा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ८० शाळांतून सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाणार आहे.
केंद्रीय मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या वतीने यंदापासून राष्ट्रीय संपादणूक चाचणीच्या माध्यमातून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. तिसरीची गुणवत्ता चांगली असून, साताऱ्याने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला होता. पाचवीच्या गणित विषयात सातारा सातव्या स्थानावर होता.
जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतून सरासरी ४५ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत. एक तासात शंभर गुणांची ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यात बहुपर्यायी प्रश्नोत्तरे आहेत. एका वर्गात वेगवेगळ्या चार प्रश्नपत्रिका वितरित करण्यात आल्या होत्या. याचे परीक्षण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.