- दत्ता यादवसातारा - फलटण येथील मंडलाधिकारी आणि महिला तलाठीला १३ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी रंगेहाथ पकडले. सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी दोघांनी लाच घेतल्याचे समोर आले आहे. महसूल विभागात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या या अधिकाऱ्यांवर झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मंडलाधिकारी जितेंद्र बाळासाहेब कोंडके (वय ५३, रा. पुजारी काॅलनी, फलटण), तलाठी रोमा यशवंत कदम (३१, रा. मलटण, ता. फलटण, जि. सातारा), अशी लाच घेताना सापडलेल्या मंडलाधिकारी आणि तलाठी महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, वडिलोपार्जित जमिनीचे वाटणी पत्रानुसार सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. त्याला तलाठी रोमा कदम हिने स्वतःसाठी तीन हजार आणि मंडलाधिकारी जितेंद्र कोंडके याच्यासाठी १० हजार, असे एकूण १३ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागात जाऊन रीतसर तक्रार नोंदवली. अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता लाचेची मागणी होत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, फलटण येथे गुरुवारी दुपारी चावडीमधील एकाच इमारतीत लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला. त्यावेळी मंडलाधिकारी कोंडके याला १३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. मंडलाधिकाऱ्यावर कारवाई झाल्यानंतर काही वेळातच तलाठी रोमा कदम हिलाही ताब्यात घेण्यात आले. फलटण शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.