सातारा : ऊस तोडला नाही म्हणून मजुरावर चाकूने वार, तिघांवर गुन्हा: पोलिसांकडून तपास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:58 PM2019-01-11T13:58:25+5:302019-01-11T13:59:25+5:30
आमच्या वाटणीचा ऊस का तोडला नाही, अशी विचारपूस करत अमोल शिंदे (सध्या रा. खोडद, ता. सातारा, मूळ रा. आष्टे, ता. परतुड) या ऊसतोड मजुरावर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये ऊसतोड मजूर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सातारा : आमच्या वाटणीचा ऊस का तोडला नाही, अशी विचारपूस करत अमोल शिंदे (सध्या रा. खोडद, ता. सातारा, मूळ रा. आष्टे, ता. परतुड) या ऊसतोड मजुरावर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये ऊसतोड मजूर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. रतन शंकर शिंदे (वय २६), कैलास शंकर शिंदे (वय २९), शिवा रामू शिंदे (वय २०, सर्व रा. आष्टे, ता. परतुड, जि. जालना) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमोल शिंदे आणि पत्नी निर्मला शिंदे हे दोेघे गेल्या काही महिन्यांपासून खोडद येथे ऊसतोड मजुरीचे काम करतात. तसेच त्यांच्याच गावातील आणखी काही मजूर या ठिकाणी वास्तव्यास आले आहेत.
दरम्यान, दि. १० रोजी रात्री आठच्या सुमारास खोडद येथील झोपडीसमोर येऊन ऊस का तोडला नाही म्हणून वरील तिघांनी अमोल शिंदेला बेदम मारहाण केली. तसेच त्याच्यावर कैलास शिंदे याने चाकूने वार केले. यामध्ये अमोल हा जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमोलची पत्नी निर्मला शिंदे हिने बोरगाव पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद दिली आहे.