साताऱ्यात विसर्जन तळ्याचा वाद पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 05:27 AM2018-09-17T05:27:31+5:302018-09-17T05:28:14+5:30
शिवेंद्रसिंहराजे यांची उदयनराजेंवर टीका
सातारा : गणेश विसर्जन तळ्यावरून खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या राष्टÑवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. उदयनराजेंनी प्रशासनाच्या विसर्जन विहिरीला विरोध करत, तळ्यात विसर्जन करण्याचा आग्रह धरला आहे, तर याच मुद्द्यावरून शिवेंद्रसिंहराजेंनी त्यांच्यावर टीका केली आहे.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षांपासून सातारा शहरातील मंगळवार व मोती तळ्यात गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात होते. याला पोलिसांची अन् प्रशासनाची कोणतीच हरकत नव्हती. मात्र, खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवार तळ्यातील पाणी दूषित होत असल्याचे कारण पुढे करीत न्यायालयाशी पत्रव्यवहार करून विसर्जनाला बंदी आणली. भोसले व कल्पनाराजे यांनीही याबाबत जिल्हाधिकाºयांशी पत्रव्यहार केला होता, असा आरोप त्यांनी केला.’
मंगळवार असो की मोती तलाव कोणत्याही तळ्याचं पाणी प्यायला वापरले जात नव्हते. तरीही पाणी दूषित होत असल्याचे कारण पुढे करण्यात आले. बाहेरच्या लोकांनी जर हे पत्र वाचले तर त्यांना असे वाटले की, सातारकर याच तळ्यातील पाण्यावर जगतायत की काय? विसर्जन तळ्याच्या मुद्द्यावरून जनतेच्या भावनांशी सुरू केलेला खेळ खासदारांनी आता बंद करावा. न्यायालयात दाखल केलेल्या दोन्ही पत्रांचा उदयनराजेंनी खुलासा करावा. वस्तुस्थिती काय आहे, हे स्पष्ट करून त्यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.