सातारा पंचायत समितीचे निवडणुकीच्या तोंडावर बेरजेची ‘पंचायत’

By admin | Published: September 10, 2014 10:18 PM2014-09-10T22:18:12+5:302014-09-11T00:12:19+5:30

सभापती-उपसभापती निवडी : प्रत्येक पंचायत समितीत राजकीय घमासान

Satara Panchayat Samiti's 'Panchayat' in the face of elections | सातारा पंचायत समितीचे निवडणुकीच्या तोंडावर बेरजेची ‘पंचायत’

सातारा पंचायत समितीचे निवडणुकीच्या तोंडावर बेरजेची ‘पंचायत’

Next

विजय पवार- नागठाणे -सातारा पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने आमदार व खासदार गटांत जोरदार तयारी सुरू झाली आहे. मनोमिलनाच्या सत्तेतून सभापतिपदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता आहे.सातारा पंचायत समितीत मनोमिलनाची सत्ता आहे. सदस्य संख्येनुसार सभापतिपदावर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाचा तर उपसभापतिपदावर खा. उदयनराजे भोसले यांच्या गटाचा दावा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची गणिते बांधताना या पदांच्या निवडींबाबत दोन्ही नेत्यांकडून ऐनवेळी होण्याची शक्यता आहे. जकातवाडी गणातील सुदर्शना चव्हाण व परळी गणातील कविता चव्हाण या सभापतिपदासाठी प्रबळ दावेदार आहेत, तर खासदार गटाकडून नागठाणे गणाच्या विश्रांती साळुंखे यांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सभापतिपद आमदार गटाकडे गेले तर सुदर्शना चव्हाण व कविता चव्हाण यापैकी एकीची वर्णी लागणार आहे. मात्र, हे पद खासदार गटाकडे गेले तर विश्रांती साळुंखे यांची निवड निश्चित मानली जात आहे. या निवडीबाबत दोन्ही नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया अद्याप व्यक्त केल्या नाहीत. जनतेचे त्याकडे लक्ष लागले आहे.

दोन्ही काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
साहिल शहा - कोरेगाव
कोरेगाव पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दोन्ही काँग्रेसकडे महिला सदस्य असल्याने त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे, मात्र ७-७ असे समसमान बलाबल असल्यामुळे चिठ्ठीद्वारे निवड होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाल्यास सभापती आणि उपसभापती पदांची सव्वा-सव्वा वर्षांसाठी वाटणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पंचायत समितीची सदस्य संख्या यापूर्वी १२ होती, मात्र २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी सदस्य संख्या दोनने वाढली आणि ती १४ झाली. काँग्रेसकडे संजना जगदाळे आणि प्रतिभा भोसले या सर्वसाधारण महिला संवर्गातून विजयी झालेल्या दोन सदस्या आहेत तर राष्ट्रवादीकडे अ‍ॅड. दीपिका शिंंदे, वर्षा घोरपडे, रूपाली जाधव व जयश्री रासकर या चार सदस्या आहेत.
पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये काँग्रेसच्या ताब्यात असलेली पंचायत समिती चमत्कार घडवत राष्ट्रवादीकडे खेचून आणली होती. तद्नंतर राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत सुंदोपसुंदीमुळे पडझड झाली आणि दोन्ही काँग्रेसला समसमान ७-७ जागा मिळाल्या. काँग्रेसचे नेतेमंडळी युती न करण्याच्या भूमिकेत कायम राहिल्याने अडीच वर्षांपूर्वी झालेल्या सभापती-उपसभापती निवडीत काँग्रेसच्या ज्योती भोज या सभापतिपदी तर राष्ट्रवादीचे कांतीलाल पाटील हे उपसभापतिपदावर विराजमान झाले.
विधानसभेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पंचायत समिती सभापतिपदासाठी आघाडी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकत्रित बसून चर्चा करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

शिंदे-पार्टे गटांत लढत
दत्ता पवार -कुडाळ
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काहींनी पक्षाशी बंडखोरी केल्यामुळेच कुडाळ गटात राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत होऊन अडीच वर्षात या गटात राष्ट्रवादीची पिछेहाट झाली. त्यामुळे पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांची सभापती-उपसभापती निवड करताना पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्यांचा प्रथम या पदांसाठी प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून होत आहे. खुल्या प्रवर्गातील सभापतिपदासाठी विद्यमान उपसभापती हणमंतराव पार्टे किंवा मोहनराव शिंदे यांच्यापैकी कोणाची निवड होईल, याकडे लक्ष लागले आहे तर उपसभापतीपदी सारिका सपकाळ यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सुहास गिरीही या शर्यतीत आहेत.हणमंतराव पार्टे, मोहनराव शिंदे यांनी आपआपल्या परीने सभापतीपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
पंचायत समितीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आहे. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून त्यांना सभापती निवडीचा निर्णय घ्यावा लागणार आहे.
विद्यमान उपसभापती हे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, वसंतराव मानकुमरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. बंडखोरांच्या बंडातही कुडाळ गणातून निवडून आलेल्या सारिका सपकाळ यांचा उपसभापती पदासाठी पक्षश्रेष्ठींना विचार करावा लागणार आहे. पक्षचिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांनाच प्रथम सभापती-उपसभापतीपदी संधी द्यावी लागणार हे निश्चित.
उपसभापतिपदाकडे जनतेचे लक्ष
संजीव वरे - वाई
वाई पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असून आठपैकी सहा राष्ट्रवादी तर दोन काँग्रेसचे सदस्य आहेत. आता ओबीसी आरक्षण असून यासाठी सुरुर येथील उमा बुलुंगे या एकच राष्ट्रवादीच्या उमेदवार असून त्यांचे नाव सभापतिपदासाठी निश्चित मानले जात आहे. तर उपसभापतिपद कोणाला मिळते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
सभापतिपद तालुक्याच्या पूर्ण भागात तर उपसभापतिपद पश्चिम भागात होते. सभापतिपदी उमा बुलुंगे यांची निवड निश्चित असली तरी उपसभापतिपद विधानसभेच्या तोंडावर कोणाला मिळते? की पूर्वीचा फार्म्युला कायम ठेवून पश्चिम भागासाठी कायम राहते, याबाबत उत्सुकता आहे.

त्रिभाजनातले सभापतिपदाचे त्रांगड काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे निवडीचा पेचे
शेखर जाधव - वडूज
खटाव पंचायत समिती निडणुकीमध्ये तालुक्यात राष्ट्रवादीचे आठ तर का़ँग्रेसचे सहा सदस्य असे बलाबल आहे. विधानसभा मतदारसंघात त्रिभाजन झालेल्या खटाव तालुक्याचे सभापती निवडीत त्रांगडे झाले असल्याचे दिसून येत आहे.
खटाव तालुक्याचे तीन विधानसभा मतदारसंघात विभाजन झाल्याने पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीकडे सगळ्या तालुक्यांसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या सर्व सदस्यांचा ताळमेळ घालणे पक्षश्रेष्ठींपुढे महाकठीण काम बनले असून नुकतीच याबाबत राष्ट्रवादी पक्षाची बैठक झाली आहे. त्यामध्ये कोरेगाव मतदारसंघात येत असलेल्या प्रभावती चव्हाण यांचे नाव राष्ट्रवादीकडून निश्चित केले आहे. गेल्या निवडीदरम्यानही चव्हाण यांचे नाव अंतिम होते, परंतु नशिबाने त्यांना दोनवेळा ठोकरले.
उपसभापती नाना पुजारी यांनी विधानसभेसाठी माण तालुक्यातील पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांचा झेंडा हाती घेतल्याने आणि येळगावकर यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याने कातरखटाव गणातील सदस्या मनीषा सिंंहासने यांना वगळता सध्या राष्ट्रवादी पक्षाकडे सहा तर तीच अवस्था काँग्रेस पक्षामध्ये ही दिसून येत आहे. गुदगे गटाचे दोन म्हणजे चितळीच्या सुलभा शिंंदे व पुसेगावचे मोहन जाधव तर आमदार गोरे गटाचे प्रियांका गोडसे, भरत जाधव, डॉ. विवेक देशमुख हे सदस्य असून रंजना खुडे या ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे यांचे नेतृत्व मानणाऱ्या असल्याने दोन्ही पक्षश्रेष्ठींपुढे निवडीसाठी महापेच उभारला आहे.

Web Title: Satara Panchayat Samiti's 'Panchayat' in the face of elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.