पुसेसावळी : खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथील ग्रामसभेत काही दिवसांपूर्वीच दारूबंदीचा ठराव झाला; पण तो कागदावरच की काय म्हणण्याची वेळ आता आली आहे. कारण सध्या गावात राजरोसपणे दारूविक्री सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थ व महिलावर्गातून नाराजीचा सूर निघू लागला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.गेल्या महिन्यात दि. २६ जानेवारीला म्हासुर्णे गावच्या ग्रामसभेत ऐनवेळच्या विषयात दारूबंदीचा ठराव मांडून तो मंजूर करण्यात आला. त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने त्याच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, वडूज पोलीस स्टेशन आदींना पाठविल्या.
या दारूबंदी ठरावामुळे गावातील दारूविक्री बंद होईल, अशी अपेक्षा होती; पण सध्यातरी ती फोल ठरल्याचे दिसून येत आहे. कारण आजही राजरोसपणे दारू विक्री व्यवसाय सुरू आहे.
हा व्यवसाय कोणाच्या मेहरबानीने सुरू आहे? हा प्रश्न येथील ग्रामस्थ व महिलांना पडला असून, प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, ठरावानंतरही गावात दारूविक्री सुरू असल्यामुळे दारूबंदी होणार का नाही, याकडे म्हासुर्णेतील महिला व ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.