'निवडणूक जवळ आल्यानेच नेत्यांच्या डोक्यात 'प्रकाश"; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 10:41 PM2021-09-15T22:41:45+5:302021-09-15T22:57:39+5:30
Shivendrasinghraje Bhosale And Udayanraje Bhosale : "सातारकरांचे काहीही देणे-घेणे नसणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राजकीय स्वार्थ डोळ्यापुढे ठेवूनच ‘खोटं बोल, पण रेटून बोल’ हा नेहमीचा पायंडा सुरू ठेवला आहे."
सातारा - पालिकेची निवडणूक आली म्हणून नेत्यांच्या डोक्यात ‘प्रकाश’ पडला आणि वर्षानंतर का होईना पथदिव्यांचे कनेक्शन घेऊन रस्त्यावर त्याचा प्रकाश पाडला गेला. हे उद्योग न कळण्याइतपत सातारकर दूधखुळे नाहीत, असा टोला नगरविकास आघाडीचे प्रमुख तथा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinghraje Bhosale) यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना लगावला. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, सातारा पालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर वर्षभरापूर्वीच अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिव्यांचे काम डीपीडीसीमधून मंजूर झाले होते आणि पोलसुद्धा उभे झाले होते. फक्त विद्युत कनेक्शन नसल्याने पथदिवे सुरू नव्हते. मात्र सत्ताधाऱ्यांना कनेक्शन घेऊन प्रकाश पाडण्यासाठी वर्ष लागले. यात सत्ताधाऱ्यांचे कौतुक म्हणावे की सातारकरांचे दुर्दैव म्हणावे.
"निवडणुकीचं बिगुल वाजल्याचं लक्षात येताच नुसत्या घोषणांचा पाऊस पाडण्याचा सपाटा सुरू"
गेल्या साडेचार वर्षांत सातारा पालिकेत कमिशन, टक्केवारी आणि टेंडरसाठी सत्ताधारी नगरसेवकांमध्ये अनेकदा कळवंडी झाल्या. एकमेकांचे गळे धरले गेले; मात्र त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करून नेत्यांनी आता निवडणुकीचा बिगुल वाजल्याचे लक्षात येताच नुसत्या घोषणांचा पाऊस पाडण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. सातारकरांचे काहीही देणे-घेणे नसणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राजकीय स्वार्थ डोळ्यापुढे ठेवूनच ‘खोटं बोल, पण रेटून बोल’ हा नेहमीचा पायंडा सुरू ठेवला आहे.
"गेल्या साडेचार, पावणेपाच वर्षांत पालिका भ्रष्टाचाराने धुऊन निघाली"
हद्दवाढ झाल्यानंतर वर्षभरापूर्वीच अजिंक्यतारा रस्त्यावरील पथदिव्यांना जिल्हा नियोजनमधून मंजुरी मिळाली होती आणि सगळं काही उभं राहिलं होतं; पण सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि खाबूगिरीमुळे कनेक्शन घ्यायला त्यांना वेळ मिळाला नाही. निसर्गनियमानुसार आता परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचपद्धतीने निवडणूक म्हटले की सत्ताधारी नेत्यांकडून विकासकामांच्या घोषणांचा पाऊसही सुरू होणार, हे सातारकरांनाही चांगलेच पाठ झाले आहे. न केलेल्या आणि न होणाऱ्या विकासकामांच्या घोषणांचा पाऊस पडून नारळ फुटणार, याची तयारी सत्ताधाऱ्यांबरोबर सातारकरांनीसुद्धा केलेली आहे. गेल्या साडेचार, पावणेपाच वर्षांत पालिका भ्रष्टाचाराने धुऊन निघाली. आता दोन-चार महिन्यांत आणखी किती ‘प्रकाश’ पडतोय, हेच सातारकरांना बघावे लागेल, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.
‘आम्ही शब्द देत नाही तर तो पाळतोही’ उदयनराजेंचं विरोधकांना आव्हान#UdayanRajeBhosale#eknathshinde#Politics#satarahttps://t.co/x0Z9TMVk5F
— Lokmat (@MiLOKMAT) September 15, 2021