सातारा : जिल्ह्यातील पारा खालावत चालला असून, सातारा शहरात आज, सोमवारी ११.०९ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान या हिवाळी ऋतूतील आतापर्यंतचे नीचांकी ठरले. तर महाबळेश्वरचाही पारा खालावलाय. त्यातच शीतलहर असल्याने गारठा चांगलाच झोंबू लागला आहे.जिल्ह्यात थंडी सुरू होऊन सवा दोन महिने झाले आहेत. ऑक्टोबर महिन्यातच थंडीला सुरुवात झाली होती. त्यावेळी किमान तापमान १३ अंशापर्यंत खाली आले होते. परिणामी, दिवाळीचे दिवस थंडीतच काढावे लागले होते. त्यानंतर नाेव्हेंबर महिना उजाडताच थंडीची तीव्रता कमी झाली होती. किमान तापमान २१ अंशावर पोहोचले होते. पण, आतापर्यंत थंडी सुरू होऊन दोन महिने होऊन गेले असले तरी कडाक्याची थंडी कधीच पडलेली नाही. कारण, सातारा शहरातील किमान तापमान हे कायम १५ अंशावर राहिले. तर थंड हवेचे महाबळेश्वरही कडाक्याच्या थंडीपासून दूर राहिले होते. कारण, हिवाळा ऋतू असूनही जिल्ह्यात कधीही सतत काही दिवस थंडी जाणवली नाही. किमान तापमानात सतत चढ-उतार सुरू आहे. आतापर्यंतच्या दोन महिन्यांत चारवेळा किमान तापमान १३ अंशापर्यंत खाली आले. त्याचबरोबर वाढत जाऊन २२ अंशांपर्यंत पोहोचले. त्यातच कमाल तापमानही वाढले होते. सातारा शहराचे तापमान ३२ अंशावर गेले होते. यामुळे पहाटे थंडी अन् दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती होती. अशा वातावरणामुळे नागरिक सर्दी, ताप, खोकला या आजाराने त्रस्त झाले होते. मात्र, मागील चार दिवसांत जिल्ह्याचे किमान तसेच कमाल तापमान कमी होत चालले आहे. यामुळे वातावरणात बदल होऊन पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे.जिल्ह्यात यंदाच्या हिवाळी ऋतूत आतापर्यंत कधीही किमान तापमान एकदम खालावले नाही. एकदाच महाबळेश्वरचा पारा १० अंशापर्यंत खाली आला होता. तर सातारा शहराचा कायम १२ अंशावर राहिला. मात्र, सोमवारी साताऱ्यात ११.०९ अंश किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान या ऋतूतील सर्वांत कमी ठरले. तर महाबळेश्वरचा पाराही ११ अंशापर्यंत खाली आला आहे. त्यातच शीतलहर असल्याने गारठा चांगलाच जाणवत आहे. यामुळे दुपारपर्यंत अंगातून थंडी जाता जात नाही, अशी स्थिती आहे. परिणामी, सकाळच्या सुमारास फिरणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे.
सातारा शहरात किमान तापमान असे :दि. २८ डिसेंबर १६.०७, २९ डिसेंबर १६.०५, ३० डिसेंबर १६.०९, ३१ डिसेंबर १५.०३, १ जानेवारी १४.०९, २ जानेवारी १४.०५, ३ जानेवारी १४.०९, ४ जानेवारी १७.०४, ५ जानेवारी १७.०५, ६ जानेवारी १५, ७ जानेवारी १८.०६, ८ जानेवारी १४.०३ आणि ९ जानेवारी ११.०९
दोन दिवसांत पारा ६ अंशांनी घसरलासातारा शहरातील पारा दोन दिवसांपासून उतरत चालला आहे. अवघ्या दोन दिवसांत किमान तापमान ६ अंशांनी कमी झाले आहे. ७ जानेवारीला सातारा शहरात किमान तापमान १८.०६ अंश नोंद झाले. तर सोमवारी ११.०९ अंशापर्यंत खाली आले. तर महाबळेश्वरचे तापमान सोमवारी ११.०१ पर्यंत खाली आले. मात्र, शुक्रवारी १४ अंश होते. महाबळेश्वरचा पाराही घसरला आहे.