सातारा : पाण्यासाठी नागरिकांचा रास्ता रोको करंजे नाक्यावर आंदोलन : प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:07 PM2018-12-12T23:07:18+5:302018-12-12T23:10:25+5:30
सलग दहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने निसर्ग कॉलनी व स्वरूप कॉलनीतील संतप्त महिलांनी बुधवारी करंजे नाका येथे रास्ता रोको केला. पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन दुरुस्त न केल्याने
सातारा : सलग दहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने निसर्ग कॉलनी व स्वरूप कॉलनीतील संतप्त महिलांनी बुधवारी करंजे नाका येथे रास्ता रोको केला. पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन दुरुस्त न केल्याने नागरिकांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांना घेराव घातला. या घटनेची माहिती मिळताच खा. उदयनराजे भोसले यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच पाणीपुरवठ्यात हलगर्जीपणा केल्यास कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा देत काम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.
शहरात पालिकेच्या वतीने भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. या कामामुळे ठिकठिकाणी रस्ता खुदाई केली जात आहे. हे काम सुरू असताना काही दिवसांपूर्वी निसर्ग व स्वरूप कॉलनीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. त्यामुळे या भागाला होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. नागरिकांनी या घटनेची माहिती तातडीने जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांना दिली. मात्र, प्राधिकरणकडून दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. पाण्याचा प्रश्न बिकट झाल्याने बुधवारी संतप्त महिला व नागरिकांनी करंजे नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले.
रास्ता रोकोमुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या आंदोलनाची माहिती मिळताच जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. नागरिकांनी त्यांच्यापुढे प्रश्नांचा पाढाच वाचला. हा वाद विकोपाला गेल्याने खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, बाळासाहेब ढेकणे घटनास्थळी आले. यावेळी नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांची कानउघडणी केली. पाणीपुरवठा दुपारपर्यंत पूर्ववत करण्याच्या सूचना देऊन कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. उदयनराजेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित झाले.
.. आता मीच सांगणार अधिकाºयांना चोपून काढा
‘प्राधिकरणच्या हद्दीत कुठे अडचणी निर्माण झाल्यास त्याची तातडीने सोडवणूक करावी. एखादी पाईपलाईन तुम्ही मार खाल्ल्यानंतर दुरुस्त करणार आहात का? ज्यासाठी आपली नेमणूक झाली आहे, ती कामे जबाबदारीने पूर्ण करा. आता कामे झाली नाहीत तर नागरिकांना मीच सांगणार आहे, सर्व अधिकाºयांना चोपून काढा. लोकांना पाणी मिळत नसेल तर ते काय करणार. कोणत्याच कामात मी हलगर्जीपणा खपवून घेणार नाही,’ अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांचा समाचार घेतला.
दोन दिवसांत दुरुस्ती करणार..
प्रतापगंज पेठेतील नामदेव वस्ती परिसराचा पाणीपुरठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. येथील नागरिकांनी बुुधवारी राधिका चौकात रास्ता रोको आंदोलन केले. या भागाला जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. आंदोलनाची माहिती मिळताच प्राधिकरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. येत्या दोन दिवसांत पाईपलाईनला लागलेली गळती काढण्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिले.
पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने निसर्ग कॉलनी व स्वरूप कॉलनीतील संतप्त नागरिकांनी बुधवारी करंजे नाका परिसरात रास्ता रोको करून जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांना घेराव घातला. दुसºया छायाचित्रात खासदार उदयनराजे भोसले यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन पाणीपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याच्या सूचना प्राधिकरणच्या अधिकाºयांना दिल्या.