सातारा : पठारावरील गवताची कुरणं बनतायत वणव्याचे भक्ष्य, वनसंपदा धोक्यात : यवतेश्वर, कास, बामणोली परिसरांत जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 04:31 PM2018-01-12T16:31:46+5:302018-01-12T16:36:09+5:30
शहराच्या पश्चिमेकडील डोंगर माथ्यावर असणारा कास परिसर वनसंपदेनं नटलेला आहे. पठारावर मोठ्या प्रमाणावर चाऱ्याची कुरणं आहेत. पावसाळा संपला की याच चाऱ्यांवर येथील पशुधन पोसतं. एवढेच कायपण येथील चाऱ्यावर जिल्ह्यातील इतर भागांतील जनावरांची भूकही भागते. अशा या सोनेरी परिसराला आता मात्र विघ्नसंतुष्टांची नजर लागली असून, वणवे लावून गवताच्या कुरणांची राख करण्यात ही अविवेकी प्रवृत्ती असणारी मंडळी धन्यता मानताना दिसत आहे. विघ्नसंतोषी मंडळीच्या मतीचा कलंक झडला तरच पठारावर गवताचे कोंब फुटतील, अशी भावना शेतकºयांतून व्यक्त होत आहे.
पेट्री : शहराच्या पश्चिमेकडील डोंगर माथ्यावर असणारा कास परिसर वनसंपदेनं नटलेला आहे. पठारावर मोठ्या प्रमाणावर चाऱ्याची कुरणं आहेत. पावसाळा संपला की याच चाऱ्यांवर येथील पशुधन पोसतं. एवढेच कायपण येथील चाऱ्यावर जिल्ह्यातील इतर भागांतील जनावरांची भूकही भागते.
अशा या सोनेरी परिसराला आता मात्र विघ्नसंतुष्टांची नजर लागली असून, वणवे लावून गवताच्या कुरणांची राख करण्यात ही अविवेकी प्रवृत्ती असणारी मंडळी धन्यता मानताना दिसत आहे. विघ्नसंतोषी मंडळीच्या मतीचा कलंक झडला तरच पठारावर गवताचे कोंब फुटतील, अशी भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
यवतेश्वर, कास, बामणोली या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने शेतीबरोबर पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. तसेच येथील संपूर्ण शेती पावसाच्या पाण्यावर अंवलबून असल्याने उदरनिर्वाहासाठी शेतकरी गुरे सांभाळताना दिसतात. गुरांना वर्षभर चारा उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहे.
सध्या या परिसरात ठिकठिकाणी वणवे लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे दुष्काळी भागातील जनावरांनाही पोसणारा हा चारा नष्ट होत असल्यामुळे पठारावरील गावातील जनावरांवरही अर्धपोटी राहण्याची वेळ येऊ लागली आहे.
या प्रवृत्तीला वेळीच रोखले नाही तर भविष्यात पश्चिमेकडील गावातील जनावरांना जगविण्यासाठी इतरांकडे चाऱ्यांसाठी मदत मागण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.