Satara: मधमाश्यांच्या हल्ल्यात पंचवीस जखमी, वाई तालुक्यातील लोहारेतील घटना, चार जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 10:41 PM2023-05-22T22:41:00+5:302023-05-22T22:42:21+5:30
Satara News: लोहारे (ता. वाई) येथील स्मशानभूमीत सावडण्याचा विधी उरकून बाहेर पडताना लोकांवर आग्यामोहाच्या पोळ्यावरील मधमाश्यांनी हल्ला केला. यामध्ये २५ जण जखमी झाले.
वाई - लोहारे (ता. वाई) येथील स्मशानभूमीत सावडण्याचा विधी उरकून बाहेर पडताना लोकांवर आग्यामोहाच्या पोळ्यावरील मधमाश्यांनी हल्ला केला. यामध्ये २५ जण जखमी झाले. जखमींमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. त्या सर्वांवर वाईतील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील चार जण गंभीर जखमी आहेत.
लोहारे (ता. वाई) येथील समिंद्रा भोसले ( वय ८५) मृत्यू झाला होता. त्यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांचा सावडण्याचा विधी सोमवारी होता. त्यासाठी त्यांचे आजूबाजूच्या गावातून नातेवाईक जमा झाले होते. सकाळी स्मशानभूमीत सावडण्याचा विधी सुरू होता. सावडण्याचा विधी पूर्ण झाल्यानंतर स्मशानभूमीतून बाहेर पडत असताना मधमाश्यांनी उपस्थितांवर हल्ला केला. त्यामुळे घाबरून सर्वजण सैरावैरा पळू लागले. त्यामुळे मधमाश्या पिसाळल्या आणि त्यांनी पंचवीस जणांना दंश केला. यामध्ये महिला व पुरुष नातेवाइकांची संख्या जास्त होती. त्यामुळे सर्वांना तातडीने वाई ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये सर्वांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. याची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली असून, जखमींचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. जखमींमध्ये लोहारे आणि गुळुंब (ता. वाई) येथील नातेवाइकांची संख्या जास्त आहे.
शोकाकुल आप्तांवर अचानक संकट
समिंद्रा भोसले यांच्या सावडणेचा विधी असल्याने लोहारेतील स्मशानभूमीत आप्तजन व इतर मिळून सत्तर जण आले होते. सावडणे विधी झाल्यानंतर ते बाहेर पडत असतानाच ध्यानीमनी नसताना मधमाश्यांचा अचानक हल्ला झाला. त्यामुळे अगोदरच शोकाकूल असणाऱ्या नातेवाईकांवरील अचानक हल्लाने नवीन संकट उभे राहिले.