सातारा : उदयनराजेंच्या सभापतींना आमदार झाल्यासारखं वाटतंय, कार्यकर्तेही थिरकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 05:54 PM2018-02-26T17:54:11+5:302018-02-26T17:54:11+5:30
सध्या साताऱ्यांत खासदार उदयनराजे भोसले अन् आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातून साधा विस्तव जात नसल्याचे वातावरण आहे. आगामी विधानसभा निवडणुुकीत मी ठरवेन तोच आमदार होणार, अशी घोषणाही उदयनराजेंनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेतील उदयनराजे गटाचे आरोग्य सभापती यशोधन नारकर यांनी मला आमदार झाल्यासारखं वाटतंय..या गाण्यावर नृत्य केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालांय.
सातारा : सध्या साताऱ्यांत खासदार उदयनराजे भोसले अन् आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातून साधा विस्तव जात नसल्याचे वातावरण आहे. आगामी विधानसभा निवडणुुकीत मी ठरवेन तोच आमदार होणार, अशी घोषणाही उदयनराजेंनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेतील उदयनराजे गटाचे आरोग्य सभापती यशोधन नारकर यांनी मला आमदार झाल्यासारखं वाटतंय..या गाण्यावर नृत्य केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालांय.
एखादं गाणं लागलं की, आपली पावलं नकळत का होईना थिरकू लागतात. असेच काहीसे चित्र साताऱ्यातील राजधानी कृषी महोत्सवात पाहावयास मिळाले. रविवारी रात्री सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना लागलेल्या मला आमदार झाल्यासारखं वाटतंय या गाण्यावर आरोग्य सभापती यशोधन नारकर यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नृत्य केलं. त्यांच्या या नृत्याला कार्यकर्त्यांनी भरभरून दाद दिली अन् स्वत:ही या गाण्यावर ठेका धरला.
पालिका निवडणुकीतील मनोमिलन तुटल्यानंतर खासदार व आमदार गटामध्ये वादविवादाचे अनेक प्रसंग उद्भवले. दोन्ही राजेंमधील द्वंद्वही सातारकरांना परिचित आहे. अशा परिस्थितीत खासदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मी ठरवेन तोच आमदार अशी घोषणा केल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता. या वातावरणात पालिकेतील उदयनराजे गटाचे सभापती यशोधन नारकर यांनी आमदार झाल्यासारखं वाटतंय या गाण्यावर नृत्य केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे.
कृषी महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहाखातर नृत्य करावे लागले. नृत्य करण्यामागे कोणताही वेगळा हेतू नव्हता. त्यामुुळे या गोष्टीचा बाऊ करण्यात काहीच अर्थ नाही.
- यशोधन नारकर, आरोग्य सभापती