सातारा : पालेभाज्यांचा दर शंभराच्या घरात गेल्याने आठवडी बाजाराचा ताळमेळ बसविण्यासाठी ग्राहकांनी फळांकडे पाठ फिरविली आहे. यामुळे बाजारात पुरेशी फळांची आवक असूनदेखील मागणी नसल्याने फळांचे दर कमी झाले आहेत. तर याउलट पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे बाजारात पालेभाज्यांचे दर फळांच्या मुळावर उठले असल्याचे फळ विक्रेत्यांमधून सांगण्यात येत आहे.
आॅक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पालेभाज्यांचे दर वाढत गेले असून, सध्या कांदा व टोमॅटोचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. याचा परिणाम इतर पालेभाज्यावरही झाला आहे. यामध्ये वांगी, पावटा, गवारी, भेंडी यांचे दर शंभराच्या घरात पोहोचले आहे.
यामुळे सर्वसामान्यांना पालेभाज्या खरेदीसाठी फळांकडे पाठ फिरवावी लागली असल्याने फळांची आवक असूनदेखील मागणी नसल्याने फळांच्या दरात दिवसेंदिवस घसरण होऊ लागली आहे.
मागील आठवड्यापासून मार्गशीर्ष हा उपवासाचा महिना सुरू आहे. या महिन्यात फळांना चांगली मागणी असते, यामुळे बाजारात फळांची आवक मोठ्या प्रमाणत झाली आहे. परंतु पालेभाज्याचा फटका फळ विक्रीवर बसला आहे.
गतवर्षी ५० रुपयांनी विकली जाणारी केळी यंदा १० ते २० रुपयांत मिळत आहे तर काश्मीरहून सफरचंदाची आवकही वाढली आहे. परंतु मागणी नसल्याने केवळ ६० ते ७० रुपये किलो विक्रीला जात असून, सफरचंदाची १५ किलोची पेटी सहाशे ते सातशे रुपये होलसेल दरात मिळत आहे. त्याचप्रमाणे इतर फळांच्याही दरात ३० ते ४० टक्क्यांनी घसरण झाली आहे.केळी केवळ १० रुपयांतमार्गशीर्ष महिना सुरू होऊन आठवडा झाला आहे. याकाळात उपवासासाठी खास करून केळींना मोठी मागणी असते. यामुळे केळींचा दर भलताच वाढलेला असतो; मात्र यंदा मागणीअभावी केळींचे दर १० रुपये झाले आहे. केळी हा नाशवंत पदार्थ असल्याने मिळेल त्या किमतीत विक्रेते केळी विकत आहेत.
भाजी मंडईत भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. कोणतीही भाजी घेतल्यास ३० रुपये पावकिलो दराने विक्री केली जात आहे. यामुळे शंभर रुपयांत पालेभाज्याबरोबरच फळे घेणे अशक्य झाले आहे.- जयश्री घाडगे,गृहिणी