शाळेची वेळ चुकली अन् आरोपी अडकला! माय-लेकरानं रात्री उशिरा बालिकेचा मृतदेह विहिरीत टाकला...आॅन दि स्पॉट रिपोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:45 AM2018-03-25T00:45:49+5:302018-03-25T00:45:49+5:30
सातारा/पुसेगाव : बालिका बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी तिचा मृतदेह गावालगतच्या विहिरीत सापडला. अत्याचारानंतर तिचा खून केला गेल्याचे स्पष्ट झाले.
सातारा/पुसेगाव : बालिका बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी तिचा मृतदेह गावालगतच्या विहिरीत सापडला. अत्याचारानंतर तिचा खून केला गेल्याचे स्पष्ट झाले.ती जेव्हा बुधवारी सायंकाळी बेपत्ता झाली, त्यावेळी गावात उपस्थित असणाऱ्या सर्वांचीच माहिती पोलिसांनी काढली. त्यानंतर पोलिसांनी गावातील दहा-पंधरा तरुणांना उचललं. मात्र, एकाच्याही जबाबातून खुनाचा उलगडा होईना. एकेकाला बोलतं करताना पोलिसांसमोर संबंधित अल्पवयीन आरोप ी आला. त्याच्या बोलण्यातून वेगवेगळी उत्तरे येऊ लागली. त्याच्या असंबंद्ध बोलण्यातून पोलिसांचा संशय वाढत गेला. मात्र, तो ताकास तूर लागू देत नव्हता.
‘बुधवारी सायंकाळी आपण शाळेत होतो,’ अशी माहिती त्याने देताच दोन पोलीस कर्मचारी खात्री करण्यासाठी गावात फिरले. मात्र, त्याची शाळा सकाळीच सुटल्याचे समजताच पोलीस अधिकाºयांचे डोळे चमकले. आरोपी शब्दात सापडला होता; फक्त त्याला बोलतं करणं बाकी राहिलं होतं. पोलीस अधिकाºयांनी थोडंसं गोड बोलून अन् थोडंसं पोलिसी खाक्या दाखवून त्याच्याकडून सत्य घटना वदवून घेतली. बांधकाम सुरू असलेल्या नवीन बंगल्यात तिचा खून केल्यानंतर हा आरोपी तेथून पळून घरी आला.
दरम्यान, ती बेपत्ता झाल्याचा गवगवा झाल्यामुळे गावकरी सर्वत्र तिचा शोध घेऊ लागले. हे पाहून आरोपी अधिकच घाबरला. त्याने घरात आईला आपल्या कुकर्माची कहाणी सांगितली. बालिकेचा मृतदेह सापडला तर आपला मुलगा अडकेल, या विचाराने भेदरलेल्या आईने रात्र होईपर्यंत वाट पाहिली. त्यानंतर रात्री उशिरा अकराच्या सुमारास माय-लेक पुन्हा त्या बंगल्यात गेले. बालिकेचा मृतदेह उचलून आईने आपल्या खांद्यावर ठेवला. त्यानंतर तिच्यावर आपल्या साडीचा पदर टाकून दोघेही गावाबाहेरच्या विहिरीजवळ गेले. विहिरीत हा मृतदेह टाकून दोघेही पुन्हा आपल्या घरी परतले.
शोध कार्यात ग्रामस्थांबरोबर आरोपीही..
खेळता-खेळता गावातून बालिका गायब झाल्यानंतर ग्रामस्थ अक्षरश: हबकून गेले. हातात बॅटरी घेऊन अख्खं गाव तिच्या शोधासाठी घराबाहेर पडलं. ग्रामस्थांसोबत तो मुलगाही सामील झाला होता. त्यामुळे त्याच्यावर संशय येण्याचं काहीच कारणच नव्हतं; परंतु पोलिसांच्या चाणाक्ष नजरेनं आणि कौशल्यामुळे त्याचे बिंग बाहेर पडलं.
गावात पोलिसांचा मुक्काम
बालिका गूढरीत्या अचानक गायब झाल्याने या प्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे, याची भणक पोलिसांना लागली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेसह पुसेगाव येथील पोलीस साध्या वेशामध्ये गावात मुक्कामाला राहिले. पोलिसांनी अनेकांकडे चौकशी केल्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलाचे नाव या प्रकरणात समोर आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
यापूर्वीही त्याच्याकडून अश्लील चाळे
बालिकेच्या खून प्रकरणात ताब्यात घेतलेल्या मुलाने काही महिन्यांपूर्वी याच बालिकेशी अश्लील चाळे केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यावेळीच त्याच्यावर तक्रार दाखल झाली असती तर ही वेळ आली नसती, असे एका पोलीस अधिकाºयाने सांगितले.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
नेर येथील घडलेल्या प्रकरणाबाबत पोलिसांनी अत्यंत गोपनियता बाळगली होती. तपास कामात अडथळा येऊ नये म्हणून गुरुवारी रात्रीपासून ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावेही पोलिसांनी पत्रकारांना सांगितले नाहीत. मात्र, शनिवारी दुपारी सर्व उलगडा झाला. या घटनेनंतर दोन दिवस नेरमध्ये तणावपूर्ण शांतता होती. संपूर्ण गावात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गावात सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. दरम्यान, शनिवारी सायंकाळी सहा वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात नेर येथे येरळा नदी काठी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.