वाई : अनेक देशांना भेटी दिल्या व अमेरिकेत स्थायिक असलो, तरी भारतीय संस्कृती व जीवनपद्धती मला अतिशय प्रिय आहे व याचा मला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन स्कॉट कफोरा यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय, वाई येथील भूगोल विभाग, अंतर्गत दर्जा हमी कक्ष व महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भूगोलशास्त्रातील बदलते प्रवाह’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष मदन भोसले, संचालक सुरेश यादव, भूगोलशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. बी. एम. गोफणे, कार्यकारिणी सदस्य डॉ. डी. जी. गाताडे, संस्थेचे सचिव डॉ. जयवंतराव चौधरी, खजिनदार प्रा. नारायणराव चौधरी, प्रा. प्राचार्य डॉ. एकनाथ भालेराव, परिषदेचे समन्वयक व भूगोलशास्त्र विभागप्रमुख डॉ. विनोद वीर व सहसमन्वयक डॉ. शिवाजी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कफोरा पुढे म्हणाले, मी नोकरी सोडली व ‘अवनी’ या अशासकीय संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य करीत आहे. कोणतीही शासकीय मदत न घेता उपेक्षित व वंचित वर्ग, तसेच महिला व बाल कामगारांच्या सबलीकरणासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहे. साधी राहणी व उच्च विचारसरणी हे आपल्या जीवनाचे सूत्र आहे. सामाजिक कार्य करताना अनेक व्यक्ती आपल्याला आर्थिक सहकार्य करतात. पैशापेक्षा ही मदत करणाऱ्या व्यक्ती, ही आपली खरी संपत्ती आहे. अमेरिकेत राहूनही आपण खादीची कपडे परिधान करीत असतो व महात्मा गांधीजींच्या विचाराने प्रेरित विविध शैक्षणिक संस्थांमध्ये काम करीत असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. मानवहितासाठी भूगोलासह सर्वच अभ्यासक्षेत्रे समाजासाठी उपयुक्त ठरली पाहिजेत, असेही ते म्हणाले.
मदन भोसले म्हणाले, आजच्या भूगोलशास्त्र परिषदेने केवळ भूगोलातील नवीन प्रवाहांची ओळख करून दिली असे नव्हे, तर जीवनातील नावीन्यता, साधेपणा त्याचीही माहिती करून दिली आहे. महात्मा गांधीजींचे विचार हे जगाला तारणारे आहेत व त्याची आज मोठ्या प्रमाणावर गरज आहे.
संस्थेचे सचिव डॉ. जयवंतराव चौधरी, परिषदेचे अध्यक्ष डॉ. बी. एम. गोफणे, डॉ. डी. जी. गाताडे, प्र. प्राचार्य डॉ. एकनाथ भालेराव, डॉ. प्रवीण सप्तर्षी, अभ्यागत प्राध्यापक यांनी शास्त्रीय अभ्यास करून आपली मते व निष्कर्ष निर्भीडपणे समाजासमोर मांडणे गरजेचे असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. अंबादास सकट व प्रा. अरिफा शेख यांनी केले. प्रास्ताविक डॉ. विनोद वीर यांनी केले, तर डॉ. किरण सोनटक्के यांनी आभार मानले.