फलटणमधील दुकाने सुरू करण्यास परवानगीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:41 AM2021-04-09T04:41:24+5:302021-04-09T04:41:24+5:30

फलटण : शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आम्ही व्यवसाय करू व वेळोवेळी दिलेल्या कडक निर्बंधांचेही पालन करण्यास तयार आहोत, तरी ...

Seeking permission to start shops in Phaltan | फलटणमधील दुकाने सुरू करण्यास परवानगीची मागणी

फलटणमधील दुकाने सुरू करण्यास परवानगीची मागणी

Next

फलटण : शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आम्ही व्यवसाय करू व वेळोवेळी दिलेल्या कडक निर्बंधांचेही पालन करण्यास तयार आहोत, तरी फलटण शहरातील व्यावसायिक, व्यापारी यांना दुकाने सुरू करण्याबाबत परवानगी द्यावी अथवा एक दिवसआड व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे फलटण येथील व्यापारी व व्यावसायिक यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

फलटण तालुका व्यापारी महासंघ, फलटण तालुका व्यापारी वेलफेअर असोसिएशन व फलटण व्यापारी संघटना फलटण यांच्यावतीने बुधवारी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता नव्याने दि. ५ एप्रिल २०२१ रोजी सातारा जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार, फक्त अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याने व्यापारी व्यावसायिक यांना खूप मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. त्याचा विचार करून फलटण शहरातील व्यावसायिक, व्यापारी यांना दुकाने सुरू करण्याबाबत परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या वर्षभरात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे फलटण शहरातील बाजारपेठ अधिक काळ बंद राहिल्याने व्यापारी, छोटे व्यावसायिक, हातगाडीवाले, वडापाव, वगैरे तत्सम खाद्यपदार्थ विक्रेते, त्याचप्रमाणे या व्यवसायातील नोकरदार, रिक्षा, माल वाहतुकीचे वाहनधारक या सर्व घटकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता आदेशानुसार फक्त अत्यावश्यक दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जो आदेश महाराष्ट्र शासनाने काढला आहे, त्यामध्ये राज्यातील आठवड्यात दोन दिवस संपूर्ण व्यापार बंद ठेवायचा आहे. परंतु आपल्या आदेशानुसार हा संपूर्ण एक महिना बंद ठेवायचा असल्याने त्यामध्ये सवलत देण्याची विनंती करण्यात आली आहे.

व्यापारी, बांधकाम क्षेत्र, ऑटोमोबाईल गॅरेज अशा विविध व्यवसायांच्या ठिकाणी अनेक कामगार काम करीत असून सध्या त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजारपेठ काही प्रमाणात सुरू झाल्यास त्यांच्या संसाराला थोडाफार हातभार लागेल. यासाठी शहरातील व्यापारी दुकाने, ऑटाेमोबाईल गॅरेज, बांधकाम क्षेत्रातील कामे, इतर व्यवसाय दैनंदिन ठराविक कालावधित किंवा एक दिवसआड पूर्ण सुरू करण्यास परवानगी देण्याची विनंती निवेदनात केली आहेे.

मे महिन्याची सुट्टी लक्षात घेऊन अनेक व्यापाऱ्यांनी लहान मुलांची खेळणी व अन्य साहित्याची मोठी खरेदी केली आहे. गुढ़ीपाडवा, अक्षय तृतीया सणाच्या पार्श्‍वभूमीवर लोक चारचाकी, दुचाकी वाहने खरेदी करतात. त्याचा मोठा स्टॉक व्यापाऱ्यांनी केला आहे. फलटणची बाजारपेठ त्वरित सुरू करावी, अशी आग्रही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

दुकाने सुरू करण्याबाबतचे निवेदन देताना मंगेश दोशी, प्रमोद निंबाळकर, विशाल पोतेकर, वसीम मणेर, प्रमोद जगताप, विकास शहा, शफीक मोदी, दिगंबर कुमठेकर यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.

Web Title: Seeking permission to start shops in Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.