नगराध्यक्षांकडून केवळ प्रसिद्धीसाठी विलगीकरणाची माहिती : सुतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:39 AM2021-04-25T04:39:29+5:302021-04-25T04:39:29+5:30
महाबळेश्वर : ‘विलगीकरणाची घरी स्वतंत्र सोय नाही अशा रुग्णांसाठी पालिकेच्या वतीने विलगीकरण कक्ष सुरू केल्याची माहिती निव्वल प्रसिद्धीसाठी नगराध्यक्षांनी ...
महाबळेश्वर : ‘विलगीकरणाची घरी स्वतंत्र सोय नाही अशा रुग्णांसाठी पालिकेच्या वतीने विलगीकरण कक्ष सुरू केल्याची माहिती निव्वल प्रसिद्धीसाठी नगराध्यक्षांनी केलेला राजकीय स्टंट आहे. अशा प्रकारे कोणताही कक्ष पालिकेच्या वतीने सुरू केलेला नाही,’ असा आरोप उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी केला.
नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन पालिकेच्या वतीने नाममात्र शुल्क आकारून विलगीकरण कक्ष सुरू केला आहे अशी माहिती दिली होती. या संदर्भात उपनगराध्यक्ष अफजल सुतार म्हणाले, ‘विलगीकरण कक्ष सुरू केल्याचे प्रसारमाध्यमांतून समजले. त्या संदर्भात मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्यासोबत चर्चा केली. विलगीकरण कक्षाची माहिती विचारली असता, ‘अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला नाही. नगराध्यक्षांनी सुरू केलेल्या विलगीकरण कक्षाशी पालिकेचा काहीही संबंध नाही,’ अशी माहिती दिली. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी दिलेली माहिती बरोबर की नगराध्यक्षांनी दिलेले वृत्त खरे आहे, हे समजत नाही.
‘मुख्याधिकारी या शासनाच्या प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेली माहिती अधिकृत आहे. नगराध्यक्षांनी दिलेले वृत्त निव्वल प्रसिद्धीसाठी केलेला राजकीय स्टंट आहे. नगराध्यक्षांनी आजवर केलेल्या अनेक खोट्या घोषणांपैकीच ही एक घोषणा आहे. त्यांची विश्वासार्हता आता राहिलेली नाही. फसवी घोषणा करून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. परंतु अशा फसव्या घोषणेला नागरिक फसणार नाहीत,’ असा टोलाही उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी लगावला.
यावेळी नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, प्रकाश पाटील व तौफिक पटवेकर उपस्थित होते.