वरकुटेतील संकल्प कोविड सेंटरची सेवा आदर्शवत : मेहबूब शेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:07+5:302021-06-09T04:48:07+5:30
वरकुटे-मलवडी : वरकुटे-मलवडीसारख्या ग्रामीण भागातील संकल्प कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना अद्ययावत सेवा मिळत असून, औषधे, आहार, रुग्णवाहिका सेवाही मोफत ...
वरकुटे-मलवडी : वरकुटे-मलवडीसारख्या ग्रामीण भागातील संकल्प कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना अद्ययावत सेवा मिळत असून, औषधे, आहार, रुग्णवाहिका सेवाही मोफत पुरविण्यात येत आहे. खरोखरच येथील तरुणांचे कार्य कौतुकास्पद आहे. हे कोविड सेंटर गोरगरिबांना संजीवनी ठरेल, असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून वरकुटे-मलवडीत उभ्या राहिलेल्या ६० बेडच्या संकल्प कोविड केअर सेंटरची मेहबूब शेख यांनी पाहणी केली. यावेळी पंढरपूरचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव अरुण असबे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब काळे, सरपंच बाळकृष्ण जगताप, धीरज जगताप, संजय जगताप, महाबळेश्वरवाडीचे माजी सरपंच विजयकुमार जगताप, शेनवडीचे माजी सरपंच संजय खिलारी यांच्यासह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
संकल्प कोविड सेंटरमध्ये ७ ऑक्सिजन बेड असून, एमडीमेडीसिन, फिजीशियनसह दोन डॉक्टर्स, चार परिचारिका यांच्यासह एकूण १५ जणांचा कर्मचारी वर्ग येथे कार्यरत आहे. रुग्णांना औषधांसह सर्व सुविधा मोफत पुरविण्यात येत आहेत. सद्यस्थितीत या ठिकाणी ६५ रुग्ण उपचार घेत आहेत. प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या भेटीने आम्ही केलेल्या कामाचे चीज झाल्याचे मत संकल्प कोविड सेंटरचे प्रवर्तक अभयसिंह जगताप यांनी व्यक्त केले.
सरपंच बाळकृष्ण जगताप यांच्यातर्फे रुग्णांसाठी देण्यात येत असलेल्या जेवणाचीही मेहबूब शेख यांनी प्रशंसा केली. प्रत्येक सरपंचाने त्यांचा आदर्श घ्यावा असे मत व्यक्त केले.
फोटो : ०८ वरकुटे मलवडी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा सत्कार अभयसिंह जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. (छाया : सिद्धार्थ सरतापे)