कोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या भिंतीत असलेल्या लिफ्टमध्ये रविवारी सात फुटाचा साप अडकला. या सापाला सुरक्षितरित्या पकडून सर्पमित्रांनी जिवदान दिले. या सापाला जंगल क्षेत्रातील नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
कोयना धरणाच्या भिंतीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या लिफ्टमध्ये रविवारी कर्मचाऱ्यांना एक साप दिसला. साप पाहताच सर्वांची घाबरगुंडी उडाली. कर्मचाऱ्यांनी तत्काळ ही बाब कोयनानगर येथील सर्पमित्र निखील मोहिते यांना सांगितली. त्यानंतर निखील मोहिते, विकास माने व अश्वजित जाधव त्याठिकाणी पोहोचले. साप लिफ्टमध्ये अडकला असल्याने लिफ्ट बंद ठेवण्यात आली होती. परिणामी, तब्बल दोनशे पायऱ्या उतरत सर्वजण चौदाव्या मजल्यावर पोहोचले. साप अत्यंत अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळे त्याला बाहेर काढणे अवघड होते. मात्र, तो बिनविषारी धामण जातीचा असल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सर्पमित्र निखील यांनी हात घालून त्याला अलगद बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; पण त्यामध्ये त्यांना अपयश आले. त्यातच सापाच्या अंगाला लिफ्टचे ग्रीस लागल्यामुळे तो निसटत होता. साप खाली सरकून भिंतीतील सर्वात खालच्या तळघरात गेला. त्यामुळे सर्वांना पुन्हा चार मजले उतरून तळघरात जावे लागले. विकास माने यांनी तळघरात उतरून साप बाहेर काढून निखील यांच्याकडे दिला. या सापाला सुखरूप एका पिशवीमध्ये ठेऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
फोटो : १४केआरडी०६
कॅप्शन : कोयना धरणाच्या लिफ्टमध्ये रविवारी साप अडकला. या सापाला सर्पमित्रांच्या प्रसंगावधानामुळे जिवदान मिळाले.