विसर्जन मिरवणूक रेंगाळत ठेवणाऱ्या सात युवकांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 01:17 PM2019-09-16T13:17:05+5:302019-09-16T13:18:25+5:30
गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळत ठेवल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात सात युवकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळत ठेवल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात सात युवकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
महेश लोया, सुयेश संतोष लुनावत, शुभम मोहन लाहोटी, शुभम सुरेश सारडा, अदित्य चर्तुभूज राठी, हितेश किर्तीकुमार शहा, सुदीप भट्टड (सर्व रा. भवानी पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेश विसर्जन मिरवणूक मोती चौकातून कामानी हौद या रस्त्याने जात होती.
यावेळी मारवाडी चौकामध्ये बराच वेळ मिरवणूक थांबली होती. ट्रक्टर ट्रॉली व त्यास जोडलेल्या ट्रॉली रस्त्यात थांबवून ट्रक्टर समोर युवक नाचत होते. त्यामुळे मिरवणूक रेंगाळली गेली, असा ठपका पोलिसांनी संबंधित युवकांवर ठेवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचेही पोलिसांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सहायक फौजदार शबीरखान लतीफखान मोकाशी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.