शाहू महाराजांचे कार्य जगाला प्रेरणादायी : सुरेश चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:25 AM2021-06-28T04:25:47+5:302021-06-28T04:25:47+5:30
नागठाणे : ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य जगाला आदर्शवत व प्रेरणादायी असून, विविध प्रकारच्या सुधारणा करून जगाला समानतेची शिकवण ...
नागठाणे : ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य जगाला आदर्शवत व प्रेरणादायी असून, विविध प्रकारच्या सुधारणा करून जगाला समानतेची शिकवण दिली,’असे उद्गार प्र. प्राचार्य डाॅ. सुरेश चव्हाण यांनी काढले.
नागठाणे येथील आर्ट्स ॲण्ड काॅमर्स महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व इतिहास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सामाजिक सुधारणा व राजर्षी छत्रपती शाहू महाराज’ विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
चव्हाण म्हणाले, ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक सुधारणा करीत असताना विचार आणि कृती यांचा समन्वय साधत बहुजनांच्या उद्धाराचे महान कार्य केले. तसेच त्यांनी समाजसुधारणा हे कार्य व्रत म्हणून स्वीकारून समग्र मानव जातीला जाती, धर्म व पंथापलीकडे जाऊन मानवतेची शिकवण दिली. त्यामुळे त्यांच्या उज्ज्वल विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेणे गरजेचे आहे.’
प्राचार्य डाॅ. जे. एस. पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ‘बोले तैसा चाले’ या उक्तीप्रमाणे समाजामध्ये समता, न्याय आणि बंधुता ही मूल्य रुजविण्याचे देदीप्यमान कार्य केले. तसेच त्यांनी बहुजनांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरतपणे कार्य करून न्याय व हक्क मिळवून दिले.’
कार्यक्रमाचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. एस. के. आतार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. आर. जे. राठोड यांनी केले. डाॅ. अजितकुमार जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास इतर महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक तसेच महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ॲानलाइन सहभाग नोंदविला.