फलटण तालुक्यात वीज पडून मेंढपाळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:38 AM2021-04-11T04:38:44+5:302021-04-11T04:38:44+5:30
आदर्की : फलटण तालुक्यातील आदर्की परिसरात शनिवारी विजेचा कडकडाटांसह पाऊस झाला. यावेळी वीज पडल्याने एक मेंढपाळ जखमी झाला. ...
आदर्की : फलटण तालुक्यातील आदर्की परिसरात शनिवारी विजेचा कडकडाटांसह पाऊस झाला. यावेळी वीज पडल्याने एक मेंढपाळ जखमी झाला. तर हणमंतवाडी घाटात ट्रक घसरून उलटला, पण सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
आदर्की परिसरात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत होते. शुक्रवारी रात्रीमोठ्या प्रमाणात वारा सुटला होता. तर शनिवारी सकाळपासून कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही झाली होती. दुपारी ढगाळ वातावरण तयार झाले. त्यानंतर विजेच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात केली. यादरम्यान, आदर्की खुर्द येथे मेंढपाळ कुंडलिक शंकर जाधव हे शेळ्या, मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी वीज पडून ते जखमी झाले. याची माहिती मिळताच तरुणांनी तातडीने फलटण येथील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले.
त्याचबरोबर आदर्की फाटा-फलटण मार्गावर पावसाचे पाणी रस्त्यावर असताना थंडपेय घेऊन जाणारा ट्रक उलटला. यामध्ये किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे वाळत घातलेली ज्वारी, बाजरी, गहू गोळा करताना नागिरकांची तारांबळ उडाली.
फोटो ओळ : फलटण तालुक्यातील हणमंतवाडी घाटात पावसामुळे घसरल्याने ट्रक उलटला. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)
...........................................................