किल्ले सदाशिवगडावर साकारणार शिवसृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:21 AM2021-03-30T04:21:35+5:302021-03-30T04:21:35+5:30
कऱ्हाड : आगामी काळात छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास भावी पिढीसमोर उभा रहावा व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी; तसेच सदाशिवगडाच्या ...
कऱ्हाड : आगामी काळात छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास भावी पिढीसमोर उभा रहावा व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी; तसेच सदाशिवगडाच्या ऐतिहासिक वैभवात भर पडावी, विभागाला पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावर वनपर्यटन योजनेतून ‘शिवसृष्टी'' प्रकल्प साकारण्यात यावा, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडेे निवेदनाद्वारे केली. प्रकल्पासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना मागणी पत्र नुकतेच देण्यात आले. यावेळी सहय़ाद्री साखर करखान्याचे संचालक रामदास पवार, राजमाचीचे सरपंच शिवाजीराव डुबल, वनवासमाचीचे सरपंच महादेव माने, हजारमाचीचे उपसरपंच प्रशांत यदव, बाबरमाचीचे उपसरपंच राहुल जांभळे, ॲड. चंद्रकांत कदम, ॲड. दादासाहेब जाधव, प्रल्हादराव डुबल, शंकरराव कदम, माणिकराव माने, विश्वासराव सुर्वे, विश्वासराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. हजारमाची, राजमाची, वनवासमाची, बाबरमाची व विरवडे गावचे सरपंच व पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने यांच्या मागणी पत्रावर सह्या आहेत.
किल्ले सदाशिवगडाचे ऐतिहासिक महत्त्व वृद्धिंगत व्हावे, यासाठी वन विभागाच्या वनपर्यटन योजनेत गडाचा समावेश व्हावा, वनपर्यटन योजनेतून गडावर शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात यावा, या प्रकल्पाअंतर्गत गडाची तटबंदी, बुरूज व प्रवेशव्दाराची निर्मिती करण्यात यावी, तसेच शिवरायांच्या जन्मकाळापासून राज्याभिषेकापर्यंतचे इतिहासातील प्रमुख प्रसंग शिल्प व चित्ररूपात साकारण्यात यावेत, जेणेकरून शिवसृष्टी पाहिल्यानंतर शिवप्रेमी, गडप्रेमी व नवीन पिढीसमोर छत्रपती शिवरायांचा इतिहास उभा राहील. गडावर शिवसृष्टी प्रकल्प साकारल्यास राज्यासह परराज्यातून शिवप्रेमी व पर्यटक किल्ले सदाशिवगडाला भेट देतील. यामुळे सदाशिवगड विभागातील पर्यटन वाढीस मदत होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
चौकट
रस्त्याच्या सर्व्हेचे काम पूर्णत्वाकडे
गडावर प्राचीन सदाशिवाचे मंदिर आहे. मात्र गडाच्या पायथ्याला राहणाऱ्या हजारो शिवभक्तांना प्रकृतीच्या कारणामुळे सदाशिवाच्या दर्शनापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे सदाशिवगडावर रस्ता करावा, अशी मागणी गतवर्षी पाच गावांनी केली होती. याची दखल घेत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचनांनुसार रस्ते विकास मंडळाने संपूर्ण गडाचा ड्रोनव्दारे सर्व्हे केला असून, राजमाची व बाबरमाची बाजूकडून रस्त्यांची आखणी केली आहे. शासनाच्या निकषानुसार सोपा व सुरक्षित रस्त्याची शासनाच्यावतीने निवड करण्यात येणार आहे.