कुडाळ : कुडाळ परिसरात रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे उत्पादन घेतले जाते. यंदा ज्वारीचे पीक जोमदार आले आहे. सारे शिवार पिकाने बहरले असून, सध्या ज्वारीचे पीक हुरड्यात, तर गहू फुलोऱ्यात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
चालूवर्षी योग्य प्रमाणात पावसाने साथ दिल्याने परिसरातील ज्वारीचे पीक जोमदार आले आहे. सध्या ज्वारीचे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून परिसरात चांगलीच थंडी पडत असून, रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू या पिकांच्या वाढीसाठी पोषक आहे. पीक वाढीसाठी चांगले वातावरण मिळाल्याने ज्वारीची वाढ जोमात झाली आहे. पोटऱ्यातील ज्वारीचे पीक निसावून कणसे बाहेर पडली आहेत. आगाप पेरणी झालेल्या ठिकाणी मात्र ज्वारीच्या कणसातील कोवळे दाणे भरण्याच्या अवस्थेत असून, ज्वारी हुरड्यात आली आहे. यामुळे आता शिवारात हुरडा पार्टीस सुरुवात होईल. याशिवाय हरभऱ्याचे घाटे भरलेले असून, गहू पिकांच्या ओंब्या भरण्याच्या स्थितीत आहेत. सर्वच पिके चांगली असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा वाटू लागली आहे.
चौकट:
शिवारात भरू लागली पाखरांची शाळा....
परिसरातील शिवार रब्बी पिकांनी फुलले असून शिवारात पाखरांची शाळा भरू लागली आहे. ज्वारीचे दाणे खाण्यासाठी बहरलेल्या पिकात पाखरांचा वावर वाढत चालला आहे. गायब झालेली चिमणीही आता पाहायला मिळत आहे. पिकांवरील कणसांकडे पक्षी आकर्षित होत आहेत. ते कणसातील कोवळे दाणे टिपून आपली भूक भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतात पीक चांगले आल्यामुळे शेतकरी समाधानी व आनंदी दिसत आहेत.
११कुडाळ
फोटो: कुडाळ परिसरातील ज्वारीचे पीक जोमात असल्याचे दिसत आहे.(छाया : विशाल जमदाडे)