कुडाळ : जावळी तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, १७ मार्चपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. दि. २५ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे आता खऱ्याअर्थाने निवडणुकीत रंग भरणार आहे. कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रा शिंदे यांचे निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी बैठका सुरू असून, १० एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तरी निवडणुकीचे चित्र अस्पष्ट असणार आहे.अध्यक्षा सुनेत्रा शिंदे यांनी कारखाना खऱ्या अर्थाने लिलावप्रक्रियेतून वाचवून भुर्इंज येथील किसन वीर कारखान्याला भाडेकरारावर चालवण्यास दिला. कामगारांच्या वेज बोर्ड व इतर प्रशासकीय कारणातून त्यांचा किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्याशी वाद झाला. कारखान्याला उभारणीपासून शरद पवारांनी अनेकदा मदत करूनही कारखाना ‘किसन वीर’ला चालवण्यास दिल्यामुळे राष्ट्रवादी सुनेत्रा शिंदेंवर नाराज झाली. हाच निवडणुकीचा कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसवा शरद पवार यांना भेटून सुनेत्रा शिंदेंनी विनंती केली होती.गत पंचवार्षिक निवडणुकीत दिवंगत पंचायत समिती सदस्य संग्राम शिंदे, उपरपंच जितेंद्र शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे यावेळी विरोध होऊ नये, यासाठी सुनेत्रा शिंदे यांनी बचाव समितीसह सर्वांशी जुळवून घेत बिनविरोधसाठी बैठका सुरू केल्या आहेत. या साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत. तर वाई, महाबळेश्वर येथील मतांसाठी आमदार मकरंद पाटील यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सर्वांशी मिळते-जुळते घेऊन कारखाना निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सुनेत्रा शिंदेंसह संचालकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला खऱ्या अर्थाने कसा प्रतिसाद मिळतो व ही निवडणूक बिनविरोध होतेय की नाही याकडेच जावळी, महाबळेश्वर तालुक्यंतील जनतेचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)५,३७८ अ आणि ब वर्ग सभासद मतदान करणार...२३ मार्च दु. ३ पर्यंत उपविभागीय कार्यालय सातारा अर्ज भरणे, २६ मार्च छाननी, २७ मार्च वैध अर्जांची यादी प्रसिद्ध. १० एप्रिल दु. ३ पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत, १३ एप्रिल चिन्ह वाटप, उमेदवारांची अंतिम यादी, दि. २५ एप्रिल सकाळी ८ ते ५ मतदान, २७ एप्रिल मतमोजणी.२०१५-२०२० या कालावधीसाठी ही निवडणूक होत आहे. या कारखान्यासाठी ५३१४ ‘अ’ वर्ग, ६४ ‘ब’ वर्ग, सभासद आहेत. ५,३७८ सभासद मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. प्रत्येक गटात तीन जागांसाठी मतदान होणार आहे. कुडाळ-३ जागा, सायगाव - ३ जागा, मेढा ३ जागा, महाबळेश्वर ३ जागा, तर ‘ब’ वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था, पणन संस्था १ जागा, अनुजाती-जमाती १ जागा, महिला प्रतिनिधी २ जागा, भटक्या विमुक्त जाती जमाती १ जागा, अशा २१ जागांसाठी मतदानप्रक्रिया राबविली जाणार आहे.शरद पवार, अजित पवार व जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शेतकरी सभासदांना विश्वासात घेऊन प्रतापगड कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात यश निश्चित मिळेल.- सुनेत्रा शिंदे, अध्यक्षा प्रतापगड कारखाना
बिगुल वाजला; पण बिनविरोधसाठी शर्थीचे प्रयत्न
By admin | Published: March 18, 2015 9:42 PM