माउलींच्या पादुकांचा नीरा स्नानाचा थाटच न्यारा!, लाखो वारकऱ्यांनी याची देही याची डोळा क्षण अनुभवला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 01:39 PM2023-06-19T13:39:43+5:302023-06-19T13:40:42+5:30
चांदोबाचा लिंब येथे उद्या उभे रिंगण
नसीर शिकलगार
फलटण :
नीरा भिवरी पडता दृष्टी,
स्नान करिता सुद्ध सृष्टी।
अंती तो वैकुंठ प्राप्ती,
ऐसे परमेष्टी बोलिल...
अशा अभंगाच्या ओवी आळवित वारकऱ्यांनी लाखो वारकऱ्यांनी नीरा स्नानाचा क्षण याची देही याची डोळा अनुभवला. प्रथेप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होत असताना रविवारी नीरा स्नान पार पडत पडला. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांनी माउली माउलीचा गजर केला.
ऐतिहासिक ,सामाजिक व क्रांतिकारी विचारांचा वारसा लाभलेल्या तसेच गुरू हैबतबाबा यांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विसावला. या जिल्ह्यात माउलींच्या पालखीचा थाठ आणखी वाढणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा यंदा पाच दिवस मुक्काम आहे. यावर्षी फलटण येथील एक मुक्काम कमी झालेला आहे. आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावर नीरा नदीवर माउलींच्या पादुकांना स्नान घालण्याचा दिव्य सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
श्री हैबतबाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळचे होते. श्रीमंत महादजी शिंदे यांच्या दरबारात ते सरदार होते. संत ज्ञानेश्वर माउलींचे निस्सीम भक्त असलेल्या हैबतबाबानी १८३२ मध्ये माउलींचा पालखी सोहळा सुरू केला. त्यांचे वंशज बाळासाहेब आरफळकर पवार हे सोहळ्याचे मालक आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली सोहळा चालतो. त्याकाळी या सोहळ्याला श्रीमंत शितोळे सरकार तसेच इतरांनी मोठे सहकार्य केले होते. पालखी सोहळ्याचे महत्त्वही त्या काळात वाढविण्यासाठी अनेकांनी योगदान दिले होते. ती परंपरा आजही चालू आहे. पालखी सोहळा प्रस्थान करत असताना आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान माउलींच्या पादुका हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब आरफळकर यांच्या स्वाधीन करते.
आळंदी ते पंढरपूर व परत आळंदीला माघारी येईपर्यंत त्या त्यांच्या ताब्यात असतात. स्वतः आरफळकर वारीसोबत असतात. ज्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सुरू केला. त्यांच्या जिल्ह्यात माउलींचे आगमन होताना अनेकांना भरून आले होते. माउलींचे स्वागत करण्यासाठी प्रशासन, राजकीय नेते मंडळी असतातच, पण जिल्ह्यातील अनेक भाविक पण स्वागतासाठी स्वतःहून उपस्थित होते.
चांदोबाचा लिंब येथे उद्या उभे रिंगण
लोणंदमध्ये दोन दिवसांसाठी पालखी सोहळा विसावला आहे. मंगळवार, दि. २० रोजी सोहळा फलटण तालुक्यात प्रवेश करणार आहे. दुपारी चांदोबाचा लिंब येथे पालखी मार्गावरील ऐतिहासिक उभे रिंगण पार पडणार आहे. त्यानंतर सोहळा तरडगाव येथील पालखी तळावर मुक्कामासाठी विसावणार आहे.
बुधवार, दि. २१ रोजी ऐतिहासिक आणि प्राचीन फलटणनगरीत सोहळा मुक्कामासाठी विसावणार आहे. आळंदी ते पंढरपूर या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील फलटण हे महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथून पंढरपूरला पायी जाण्यासाठी आणखी भाविक सहभागी होत असतात. त्यामुळे सोहळ्यात गर्दी आणखी वाढते.