साईडइफेक्टमुक्त आयुर्वेदाने दिला कोविड रूग्णांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:17 AM2021-05-04T04:17:56+5:302021-05-04T04:17:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनावर प्रचलित उपचार पध्दतीतही ठोस उपचार नाहीत. मात्र, प्रचलित उपचारांमध्ये औषधांचा अतिरिक्त वापर आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनावर प्रचलित उपचार पध्दतीतही ठोस उपचार नाहीत. मात्र, प्रचलित उपचारांमध्ये औषधांचा अतिरिक्त वापर आणि त्यामुळे शरिरावर होणारे विपरीत परिणाम पाहता, अनेकांनी कोविड काळात आयुर्वेदाला प्राधान्य दिले. अनेक रूग्णांनी महिनाभर उपचार घेऊन कोविडमुक्तीची वाट स्वीकारल्याचीही उदाहरणे आहेत. साईडइफेक्टमुक्त आयुर्वेदाने या काळात रूग्णालयांवरील ताण कमी करण्याबरोबरच रूग्णांमध्ये सकारात्मकताही तयार केली.
गतवर्षापासून कोविडने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. नोव्हेंबरनंतर कोविड आटोक्यात येतोय, असे वाटत असतानाच दुसऱ्या लाटेने हैदोस मांडला. बाधितांबरोबरच मृतांचा आकडा वाढू लागल्याने सर्वांनीच कोरोनाची धास्ती घेतली. त्यानंतर सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे असलेली व्यक्ती कोविड रूग्ण म्हणूनच तपासा, असे जिल्हा प्रशासनानेही सूचित केले. त्यामुळे रूग्णांवर इंजेक्शन आणि औषधांचा मारा होऊ लागला. याचे गंभीर दुष्परिणाम आणि त्याचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर अनेकांनी आयुर्वेदीय उपचाराकडे मोर्चा वळवला.
आयुर्वेदात वेगवेगळे औषधी कल्प, काढे, चुर्णांचा वापर प्रभावी पध्दतीने होतो. रसौषधीसारख्या प्रभावी वापराने रूग्णांमध्ये लवकर आराम मिळाल्याचीही उदाहरणे आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर ५ दिवसात सर्दी, घशात खवखव, घसा दुखणे, अंग दुखणे, थकवा, मंद ताप ही लक्षणे कमी-अधिक प्रमाणात आढळतात.
चौकट :
आठवडा ते महिन्याचाही कालावधी!
प्रचलित उपचार पध्दतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक रूग्णाला औषधांचे तेच डोस दिले जातात. वयोमानाच्या हिशेबाने एखादी गोळी कमी-अधिक सोडली तर बहुतांशी एकसारख्याच गोळ्या दिल्या जात आहेत. याउलट आयुर्वेदीय उपचारात रूग्णाचे वय, प्रकृती, शारीरिक दोष या सर्वांचा विचार आणि अभ्यास करून मगच उपचार दिले जातात. त्यामुळे प्रत्येक रूग्णाला त्याच्या शरिराच्या गरजेनुसार दुष्परिणाम होणार नाहीत, याचा विचार करून मगच औषधे दिली जातात. त्यामुळे कमी लक्षणं असलेला रूग्ण एका आठवड्यात बरा होतो तर अधिक लक्षणे असलेल्या रूग्णाला बरे व्हायला महिन्याचा कालावधी जातो. हा कालावधी मोठा वाटत असला, तरीही रूग्णांना कोणत्याही दुष्परिणामांशिवाय बरे वाटत असल्याने हे उपचार सुखावह ठरत आहेत.
कोट :
कोविड काळात अनेकांना आयुर्वेद उपचारांचे महत्त्व लक्षात आले आहे. या कठीण काळात आयुर्वेद आशेचा किरण ठरला आहे. भारतीय वैद्यकशास्त्र या कोरोना महामारीच्या संकटात स्वत:ला सिध्द करत आहे. आता गरज आहे ती शासनाची आणि समाजाची आयुर्वेद उपचार पध्दतीकडे सकारात्मकतेने पाहण्याची.
- वैद्य संतोष महाडिक, सातारा