संचारबंदीमुळे रात्री रस्त्यांवर सन्नाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:40 AM2021-04-08T04:40:18+5:302021-04-08T04:40:18+5:30
कऱ्हाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री ८ ते सकाळी ७ वाजण्यापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाची कऱ्हाडात पोलिसांकडून ...
कऱ्हाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री ८ ते सकाळी ७ वाजण्यापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाची कऱ्हाडात पोलिसांकडून प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, आदेशाचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई केली जात आहे, तसेच गुन्हाही दाखल करण्यात येत आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे रात्री रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून, कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. दररोज रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी संचारबंदी करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात ठिकठीकाणी अशा पद्धतीने कारवाई होत असून, कऱ्हाड शहर पोलिसांनी उपअधीक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सराटे, पोलीस नाईक संजय जाधव, पोलीस नाईक वसीम संदे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांची बारा पथके तयार केली आहेत. त्यापैकी सहा पथके नेहमीची तर सहा पथके केवळ लॉकडाऊन काळासाठी तयार करण्यात आली आहेत. थेट कारवाई करण्याचे अधिकार या पथकांना देण्यात आले आहेत. दुचाकीवरून ही सहाही पथके शहरात लक्ष ठेवत आहेत. गर्दी करणाऱ्या व कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांना प्रथम समजावून सांगण्यात येत आहे. त्यानंतर, संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
पोलिसांच्या कारवाईमुळे शहरात रात्री शुकशुकाट जाणवत आहे. सायंकाळी ७ वाजल्यापासून नोकरदार घराकडे धाव घेताना दिसून येत आहेत. रात्री आठपर्यंत रस्त्यांवर ही वर्दळ राहते, तर आठनंतर पोलिसांकडून रस्त्यावर फिरणाऱ्यांची चौकशी सुरू होते. सबळ कारणाअभावी कोणी रस्त्यावर फिरत असेल, तर संबंधितावर तत्काळ कारवाई होते. परिणामी, रात्री आठनंतर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे.
- चौकट
कऱ्हाडात कारवाई
१२ : पोलीस पथके
०२ : दिवस
१२ : गुन्हे दाखल
५१ : जणांवर कारवाई
१० : दुचाकी जप्त
- चौकट
नियमभंग करणाऱ्यांवर अशी होते कारवाई
१) दुकानदारास तीन हजार रुपये दंड
२) सात दिवस दुकानाचा परवाना रद्द
३) विनामास्क फिरल्यास पाचशे रुपये दंड
४) संचारबंदीचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल
५) विनाकारण फिरणाऱ्यांची दुचाकी जप्त
- चौकट
नियम पाळा; सुरक्षित रहा!
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरावर नागरिकांनी भर द्यावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. संचारबंदी कालावधीत घराबाहेर पडू नये. जमावबंदी असल्याने पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊ नये. दुकानदार व व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन कऱ्हाड शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
फोटो : ०७केआरडी०५
कॅप्शन : कऱ्हाडातील रस्त्यावर संचारबंदीमुळे रात्रीच्या वेळी पूर्णपणे शुकशुकाट दिसून येतो.