मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्षांकडून, आघाड्या व युतींकडून उमेदवारांच्या घोषणा होत आहेत. राज्याचं लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून अद्यापही महायुती व महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित झाला नाही. महायुतीकडून साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून कोण, हे अद्यापही स्पष्ट नाही. त्यामुळेच, साताऱ्यातील जागेवर सर्वांचे लक्ष आहे. त्यातच, महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी साताऱ्यात येऊन कॉलर उडवून थेट उदयनराजेंना आव्हान दिले. त्यावर, आता पुन्हा एकदा उदयनराजेंनी आपली भूमिका मांडली आहे.
शरद पवारांनी तुम्हाला आव्हानच दिलंय, असा प्रश्न उदयनराजेंना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर, मी काय बोलणार, ते वडिलधारी आहेत. माझं बारसं जेवलेल्या लोकांबद्दल मी काय बोलणार, असे म्हणत उदयनराजेंनी शरद पवार यांच्या कॉलर उडवण्याला आव्हान समजत नसल्याचे म्हटले. यावेळी, त्यांनी कॉलर उडवण्याची स्टाईल नेमकी कशी आणि कधीपासून सुरू झाली याचा किस्साही सांगितला.
मी कासला गेलो होतो, घाटाच्या मंदिराची यात्रा होती, त्यासाठी गेलो होतो. त्यावेळी, तिथे प्रत्येकजण म्हटलं स्टाईल करायची. कुणी कॉलर, मागे गॉगल-फिगल लावून होते. त्यावेळी, माझा एक जिवलग मित्र म्हणाला तुमची काय स्टाईल. मग, मी म्हटलं माझी कुठली स्टाईल-फिईल. मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, लोकांच्या हिताचं काम केलं. पण, ते म्हटले काहीतरी स्टाईल केली पाहिजे. त्यावेळी, मला एवढा अधिकार आहे, कोणीही सांगू द्या, कुठंही, केव्हाही तयार आहे?, असे म्हणत मी कॉलर उडवून दाखवली होती. तेव्हापासून ही कॉलर स्टाईल पडून गेली, असा किस्साच उदयनराजेंनी पत्रकारांसमोर सांगितला. यावेळी, त्यांनी कॉलर उडवून दाखवली.
दरम्यान, मी लोकांसाठी काम करतो, त्यामुळे सध्या गावागावात जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेत आहे. मी निवडणुकीला उभाच राहणार आहे. समोरुन कोण आहे, याची माहिती नाही. पण, मी कधीच राजकारण केलं नाही, मी नेहमी समाजकारण केलं. त्यामुळे, लोकंच ठरवतील, असे म्हणत उदयनराजेंनी साताऱ्यातील स्वत:च्या उमेदवारीवर भाष्य केले.
शरद पवारांनी उडवली होती कॉलर
खा. उदयनराजेंनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही अनेकदा कॉलर उडवून विरोधकांना इशारा दिला होता. विशेष म्हणजे एका कार्यक्रमात स्वत: शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवली होती. त्यानंतर, आता साताऱ्यात लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शरद पवार यांचा दौरा होता. त्यावेळी, त्यांनी स्वत:ची कॉलर उडवून उदयनराजेंना अप्रत्यक्षपणे चॅलेंज दिलं आहे. सध्या, शरद पवारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये, ते कॉलर उडवताना दिसून येतात.