वाई : काही खासगी लॅबचालक कोरोना संसर्गाच्या तपासणीसाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त आकारणी करत असल्याच्या तक्रारी सामाजिक संघटनांनी केल्या होत्या. त्यानंतर तहसीलदार रणजीत भोसले यांनी शहरातील लॅब चालकांना नोटिसा पाठवून शासकीय दरपत्रकाप्रमाणे तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर सेवा बजावण्याचे खासगी लॅबधारकांनी जाहीर केले.
संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेला मर्यादा पडतात. खासगी लॅबधारकांची सेवा महत्त्वाची आहे. परंतु लॅबधारकाकडून जास्त शुल्काची आकारणी केली जात असल्याची सामाजिक संघटनांनी तक्रार केली होती. वाई लॅबरोटरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार रणजित भोसले यांची भेट घेऊन लॅबधारकासमोरील अडचणी सांगितल्या. तसेच तपासणीसाठी येणारा प्रत्यक्ष खर्च सामाजिक बांधिलकी म्हणून करत असलेल्या कामाविषयी माहिती दिली. यानंतर आमदार मकरंद पाटील, उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांना वस्तुस्थिती सांगितली. कोरोना काळात ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर कोरोना चाचणी करण्याची ग्वाही दिली. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. (वा.प्र.)