सोनगाव प्रकाशमय, ६५ कुटुंबीयांचा काळोख कायमचा दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:16 AM2018-05-14T00:16:21+5:302018-05-14T00:16:21+5:30
सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून मिनमिनत्या दिव्याखाली आपला संसाराचा गाडा चालविणाऱ्या तसेच आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आपल्या घरी कधी वीज येईल, अशी कल्पनाही न करणाºया फलटण तालुक्यातील सोनगाव येथील ६५ कुटुंबियांच्या घरातील काळोख कायमचा दूर झाला आहे. या कुटुंबांना शासनाच्या सौभाग्य योजनेअंतर्गत मोफत वीजकनेक्शन मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.
फलटण तालुक्यातील सोनगावच्या वयोवृद्ध माने दाम्पत्याच्या चंद्र्रमौळी झोपडीत रॉकेलवर चालणारा मिणमिणता दिवा हाच रात्रीच्या अंधारात उजेडाचा एकमेव आधार होता. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना वीजजोडणी घेता आली नव्हती. मात्र महावितरणने सौभाग्य योजनेतून नुकतीच माने दाम्पत्यास मोफत वीजजोडणी दिली. आयुष्याच्या उत्तरार्धात विजेचा प्रकाश मिळाल्याने माने दाम्पत्याच्या घराबरोबरच त्यांचा चेहराही आनंदाने उजळून निघाला.
फलटणपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर बहुसंख्य दलित वस्ती असलेलं पावणेचारशे उंबरठ्यांचं सोनगाव. शेतमजुरी हेच बहुतेकांच्या उदरनिवार्हाचं साधन. त्यामुळे काही घरांत स्वातंत्र्यानंतरही वीज पोहोचू शकली नव्हती. वीजजोडणी घ्यायची म्हटली तरी त्यासाठी पैसे आणायचे कोठून? असा यक्षप्रश्न अनेकांसमोर पडलेला. रॉकेलवर तेवणारी चिमणी अन् कंदिलाचा अंधूक प्रकाश हेच त्यांचं प्रारब्ध होतं.
अशावेळी आसपासच्या घरांतले विजेचे दिवे पाहून आपल्याही घरात वीज असती तर किती बरं झालं असतं, असा विचार या दाम्पत्याच्या मनाला स्पर्शून जायचा; पण स्वप्न व सत्यात अडसर होता तो आर्थिक परिस्थितीचा. अशातच ११ एप्रिल २०१७ ची सकाळ त्यांच्या आयुष्यात स्वप्नपूतीर्ची आस घेऊन आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ जयंतीनिमित्त केंद्र सरकारने ग्रामस्वराज्य अभियानातून विजेपासून वंचित असलेल्या मागास नागरिकांना सौभाग्य योजनेतून वीज देण्याचा कार्यक्रम हाती घेतला. माने दाम्पत्यासह ६५ घरे वीजजोडणीपासून वंचित असल्याचे आढळून आले. यातील एकही घर अंधारात राहू नये म्हणून महावितरणने सोनगावात तीनवेळा लाभार्थ्यांच्या बैठका, भेटीगाठी घेतल्या. या लाभार्थ्यांना ५ मेपर्यंत वीजजोडणी देण्याची कालमर्यादा शासनाने निश्चित केली होती. परंतु सूर्यवंशी व त्यांच्या सहकाºयांनी रात्रीचा दिवस करत मुदतीपूर्वीच काम पूर्ण केले. तब्बल ११ नवीन खांब व तारा बसवून ६५ घरांत त्यांनी प्रकाश पोहोचविला.
वायरिंग पूर्ण झाल्यानंतर यशोदा माने यांनी बटन दाबताच दिवसाही एलईडी दिव्याच्या प्रकाशाने घर उजळून निघाले. त्यांचा आनंदी चेहरा पाहून महावितरणच्या कर्मचाºयांनाही कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळाले.