सातारा : शिवसागर जलाशयात झालेल्या वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा बुडून मृत्यू झाला, तर दोन जण बचावले आहेत. गजेंद्र बबन राजपुरे (वय ४२, रा. दरेवाडी ता. वाई) असे मृताचे नाव आहे. तर सतीश थोरवे (५२ रा. वाई) व बालेश्वर महातो (४२) हे बचावले आहेत.दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या मदतीने बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. मात्र, वादळी वाऱ्यासह झालेल्या प्रचंड पावसामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले.याबाबत अधिक माहिती अशी की, कोयना जलाशयावर तापोळा ते आहिर या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यावेळी कामाची पाहणी करण्यासाठी काही अधिकारी बोटीतून तापोळ्याला गेले होते. दरम्यान, पुलाच्या कामाची पाहणी करून परतत असताना तेटली (ता. जावळी) हद्दीत झालेल्या वादळी वाऱ्यात स्पीड बोट सापडून उलटली. बुडालेल्या व्यक्तीचा अद्याप शोध लागला नसून, रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरूच होती. महाबळेश्वर ट्रेकर्सला पाचारण केले आहे. सकाळी लवकर शोधमोहीम सुरू होणार आहे.बांधकाम कंपनीचा निष्काळजीपणातेटली (ता. जावळी) हद्दीत घटलेल्या या घटनेत कंपनीचे दोन अधिकारी बचावले, मात्र एकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू कसा झाला? त्याने लाइफ जॅकेट घातले नव्हते का? बोट कोणाच्या मालकीची होती? बोट चालकाकडे प्रवासी वाहतुकीचा परवाना होता का? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
Satara: वादळी वाऱ्यामुळे शिवसागर जलाशयात स्पीड बोट उलटली; एक जण बुडाला, दोघे बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 1:35 PM