कऱ्हाड : गोर-गरिबांना सुखात-समाधानात ठेव, शेतात पेरलेल्या पिकाला जगवण्यासाठी पाऊस पडू दे गं... कृष्णाबाई ! दुष्काळ हटू दे गं... कृष्णाबाई ! असे साकडे संबंध कऱ्हाडकरांसह भाविकांनी घालत कृष्णाबाईचे दर्शन घेतले. कऱ्हाडचे ग्रामदैवत असलेल्या कृष्णाबाईची यात्रा श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राज्यभरासह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी यात्रेसाठी उपस्थिती लावली होती.प्रतिवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी कृष्णाबाईची यात्रा भरविली जाते. या यात्रेसाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. कृष्णा नदीकाठी असलेल्या हेमाडपंथी मंदिरात सिंहारुढ अशा अवस्थेत अतिशय सुंदर व तेजस्वी असे रूप असलेल्या कृष्णाबाईची मूर्ती ठेवण्यात आली आहे. प्रवाहाकडे पाहत असलेल्या अवस्थेत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.कृष्णाबाईच्या मूर्तीबद्दल अनेक अख्यायिका सांगितल्या जातात, त्यापैकी एक म्हणजे चाफळचे बाजीपंत करकरे यांनी कोकणात बसविण्यासाठी पांढऱ्या पाषाणाची देवीची मूर्ती उत्तर हिंदुस्थानातून तयार करून आणली होती; पण त्यांच्या पत्नीली ‘ही मूर्ती कृष्णाकाठी स्थापन करावी व कऱ्हाडच्या अंताजी बहिरव यांच्या स्वाधीन करावी’ असा दृष्टांत झाला. म्हणून त्यांनी कऱ्हाडला कृष्णाकाठी झोपडीवजा जागेत देवीची स्थापना केली. भगवंतराव पंतप्रतिनिधी यांच्या पत्नी राजसबाई या विटे येथे राहत. त्यांच्याकडे कामासाठी आलेला गुजराथी ब्राह्मण निपुत्रिक मरण पावला. त्यामुळे त्याच्या बेवारशी तीन हजारांच्या मालमत्तेचा विनियोग झोपडीच्या जागी सध्याचे दगडी हेमाडपंथीय बांधकाम असलेले देऊळ बांधण्याच्या कामी त्यांनी केला व देवीला ‘कृष्णाबाई हे नाव दिले. त्यानुसार १७०९ मध्ये कृष्णाकाठी देवीची स्थापना करण्यात आली.उत्सवकाळात वाळवंटात मोठा मंडप उभारण्यात आला होता. या ठिकाणी देवीची उत्सव मूर्ती ठेवून तिच्यावर हळदी-कुंकू वाहण्यासाठी महिला वर्गाने गर्दी केली होती. सकाळी दुग्धाभिषेकाने देवीच्या मूर्तीस स्नान घालून तिची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी पूजेनंतर महाआरती करण्यात आली. त्यानंतर देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी देवीची ओटी भरून दर्शन घेतले. दरवर्षी हजारो भाविक येथे येतात. (प्रतिनिधी)सिंहारुढ कृष्णाबाई...कऱ्हाडकरांचे ग्रामदैवत असलेली कृष्णाबाई देवीची मूर्ती ही दशभुजा, सिंहारुढ असून, महिषासुराचा वध करतानाची आहे. मूर्तीची मान तिरपी असून, ती कृष्णा प्रवाहाकडे पाहत आहे. अतिशय सुंदर व तेजस्वी असे रूप असलेल्या कृष्णाबाईच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी हजेरी लावतात.भुईमुगाच्या शेंगा अन् चटणी-भाकरीकृष्णाबाई यात्रेसाठी गावोगावातून देवी-देवतांच्या पालख्या घेऊन आलेल्या भाविकांनी कृष्णा नदीकाठी देवीचे दर्शन घेऊन अंघोळ केली. अन् प्रसादात शेतातून आणलेल्या भुईमुगाच्या शेंगा अन् चटणी-भाकरी खाल्ली.हलगी अन् नृत्यांचा आविष्कारश्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी भरत असलेल्या कृष्णाबाईच्या यात्रेसाठी ग्रामीण भागातून आलेल्या विविध देव-देवतांच्या पालख्यांपुढे हलगी, ढोल अन् वाजंत्री यांच्याकडून वाजवत होते. त्यांच्या आवाजावर काही भाविकांनी ठेका धरला होता. यावेळी धनगर समाजातील भाविकांकडून आकर्षक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले.आम्ही पिढ्यान्पिढ्यापासून कृष्णाबाईच्या यात्रेसाठी गावातील निनाई देवीची पालखी या ठिकाणी घेऊन येतो. येथे देवीची पालखी आणून नदीत स्नान करून देवीची आरती करतो.- भास्कर यादव,भाविक, गमेवाडी
बोलक्या बाहुल्यांसह चिमुकलेही थिरकले!
By admin | Published: September 07, 2015 9:38 PM