ओगलेवाडी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हजारमाची दक्षता समिती सरसावली असून, आता हजारमाची ग्रामपंचायत हद्दीत विनामास्क फिरणाऱ्यांची जागेवर कोरोना चाचणी केली जात आहे. मुख्य बाजारपेठेत प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी आणि दक्षता समिती अशा लोकांचा शोध घेऊन त्यांची जागेवर चाचणी करीत आहेत. सरपंच विद्या घबाडे, उपसरपंच प्रशांत यादव व सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी चिंचकर या मोहिमेचे नेतृत्व करीत आहेत.
ओगलेवाडी ही या परिसराची मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत विविध उपाययोजना करीत आहे. जनता कर्फ्यू, जनजागृती, सॅनिटायझरचे वाटप या उपाययोजना केल्या. मात्र, ग्रामस्थ गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे बरोबरच आता जागेवर कोरोना चाचणीचा मार्ग अवलंबण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी ही चाचणी करायला सुरुवात झाली. मोठी वर्दळ असणाऱ्या मुख्य चौकात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी दिसू लागली. नाकाखाली मास्क ठेवणाऱ्याच्या नाकावर झटकन मास्क सरकू लागले आहेत.
ही मोहीम सुरू करताना सरपंच विद्या घबाडे, उपसरपंच प्रशांत यादव, हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ, दक्षता समिती सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ.अभय पवार, सर्जेराव पानवळ, शरद कदम उपस्थित होते.
चौकट
चिलखताचे काम मास्क करतोय.
ऐतिहासिक युद्धात शत्रूच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी योद्धे चिलखत वापरून सुरक्षित राहत होते. आता ही कोरोनाविरुद्धच्या लढाईत मास्क हेच चिलखत आहे. हे चिलखत सर्वांनी वापरले, तर हे युद्ध आपण नक्कीच जिंकू. त्यामुळे मास्कचा वापर वाढला, असे मत उपसरपंच प्रशांत यादव यांनी व्यक्त केले आहे.