लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने ''ब्रेक द चेन'' ऑपरेशन सुरू केले. याअंतर्गत दर शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामधून एसटीची प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मुभा दिली असली तरी प्रवाशांची संख्या विचारात घेऊनच गाडी सोडण्याचा विचार एसटी प्रशासन करत आहे. यादृष्टीने नियोजन करण्यात अधिकारी गर्क आहेत.
राज्यभरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक संख्या आढळून आली. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ''ब्रेक द चेन''ची घोषणा नुकतीच केली. या अंतर्गत नागरिकांवर काही निर्बंध लादले आहेत. दर शनिवार रविवारी कडकडीत बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. या दृष्टीने शासनाचा प्रत्येक विभाग काम करत आहे. यामधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटीला सवलत दिली असली तरी या दिवशी इतर सर्व व्यवहार बंद असल्याने प्रवासी घराबाहेर पडतीलच याची शाश्वती नाही. त्यामुळे परिणाम होऊ शकतो.
राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या गेल्या वर्षी मार्चपासून तब्बल सहा ते सात महिने एकाच ठिकाणी उभ्या होत्या. या काळात एसटीला मोठा आर्थिक फटका बसला. उत्पन्न घटल्याने कर्मचाऱ्यांचे पगारही करणे अवघड झाले होते. हा अनुभव गाठीशी असल्याने मोजक्या प्रवाशांना घेऊन फेरी मारणे एसटीला सध्या परवडणारे नाही. डिझेलचे वाढते दर आणि घटते उत्पन्न यांचा कसा मेळ बसवायचा ही चिंता एसटी प्रशासनास सतावत आहे. शासनाने घालून दिलेल्या निर्देशानुसार प्रवासी उपलब्ध असतील तरच फेरी केली जाऊ शकते हा विचार करून शुक्रवारी पुणे, मुंबईला किती गाड्या पाठवायच्या, जेणेकरून माघारी येताना त्यांना प्रवासीही मिळतील त्याचा अंदाज बांधून नियोजन केले जात आहे.
कोट
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेप्रमाणे एसटीला प्रवासी वाहतूक करण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र, शनिवार - रविवारी लागू केलेल्या लॉकडाऊनचा विचार करून एसटीच्या फेऱ्या सोडण्यात येत आहेत. गैरसोय होणार नाही याचा विचार करून नियोजन केले जाणार आहे. प्रवाशांमधून मागणी झाल्यास तत्काळ एसटी उपलब्ध करून दिली जाईल.
- ज्योती गायकवाड
विभागीय वाहतूक अधिकारी, सातारा.