भररस्त्यात थेट पोलिसांना धक्काबुक्की!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2015 08:16 PM2015-08-31T20:16:07+5:302015-08-31T23:40:06+5:30
वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यासोबत हुज्जत : साताऱ्यात कायद्याचा धाक राहिलाय का ?-न्यूज लेन्स...
साई सावंत -सातारा =-पूर्वी पोलिसाच्या वेशात बहुरूपी जरी गावात आला तरी धडकी भरायची. कळती मुलंही रडकुंडीला यायची, तर ज्येष्ठमंडळीही त्या नकली ‘वर्दीवाल्या’शी अदबीनं वागायची. आता जमाना बदललाय. कायद्याचा अन् खाकीचाही धाक कुणाला राहिला नाही. एककीडं आॅन ड्युटी असणाऱ्या पोलिसांना मारहाण होते तर दुसरीकडं पोलिसांकडूनही खाकीचा हिसका दाखविला जातो. ‘लोकमत’च्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या सातारा शहरातील काही घटनांवरून असेच काहीसे चित्र पाहायवयास मिळाले.
स्थळ - बॉम्बे रेस्टॉरंट चौक. उड्डाणपुलाखाली वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सेवेत तैनात होते. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांवर त्यांची करडी नजर होती. अशातच एका वाहतूक पोलिसाची नजर एका दुचाकीवर स्थिरावली. नंबरप्लेटवरून ती गाडी सातारा जिल्ह्यातील नसल्याचे त्यांनी हेरले अन् पुढे होऊन त्यांनी दुचाकीस्वाराला थांबण्याचा इशारा केला.
पुण्याच्या दिशेने निघालेल्या त्या दुचाकीस्वाराने गाडी थांबविली. दुचाकीवर पाठीमागे एक महिला होती. पोलीसदादाने दुचाकीस्वाराकडे लायसन मागितले. त्यानेही ते दाखविले. त्यानंतर पोलिसाने गाडीच्या कागदपत्रे दाखविण्यास सांगितले. त्यावर ‘कागदपत्रे गाडीत नाहीत. असे सांगितले. पोलिसाने गाडीची चावी काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करताना दुचाकी रस्त्यावर पडली अन् दोघांमध्ये झटापट
झाली.
वाक्युद्धानंतर झटापट...
गाडीची कागदपत्रे नसल्यामुळे पोलिसांनी गाडीची चावी काढून घेताना दुचाकीस्वाराचा तोल जाऊन गाडी पडली. पाठीवरील सॅकही फेकली गेली. त्यामुळे तो संतापला. रागाने अंगावर जाऊन ‘मी कोण आहे, तुला दाखवतो, असे म्हणत त्याने पोलीसदादाशी हुज्जत घातली. या प्रकारानंतर पोलीसदादानंही ‘चल, तुला दाखवतो मी कोण आहे,’ असे म्हणत त्याची बखोटी पकडली. त्यानंतर दुचाकीचालकानंही बोट दाखवून दम भरला. दोघांमधील वाक्युद्ध अन् झटापट पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती.
महिलेनं दिला धक्का !
दुचाकीचालक अन् पोलिसांमध्ये वाक्युद्ध सुरू असताना दुचाकीस्वाराबरोबर असलेल्या महिलेने पोलिसाच्या खांद्याला धक्का देऊन त्यांना मागे सारण्याचा प्रयत्न केला.
महत्त्वाचं काम आहे,
जाऊ द्या आम्हाला..
परवाना दाखविल्यानंतर पोलिसांनी गाडीची कागदपत्रे दाखविण्याची मागणी केली. मात्र, ‘आता माझ्याकडे कागदपत्रे नाहीत. पुण्याला महत्त्वाच्या कामासाठी निघालोय, जाऊ द्या आम्हाला, असे दुचाकीस्वार सांगू लागला होता. मात्र, सुरुवातीला अरेरावीची भाषा वापरल्यामुळे पोलीसदादाचा पारा चढला होता.
दुचाकीसाठी दाखविला चारचाकीचा परवाना
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी एका महिला दुचाकीस्वाराला अडवून त्यांच्याकडे दुचाकी चालविण्याचा परवाना मागितला. त्यावर त्या महिलेने पोलिसाच्या हाती चक्क चारचाकी चालविण्याचा परवाना ठेवला. पोलिसांनी दुचाकीचा परवाना मागितला. त्यावर ती महिला म्हणाली, ‘अहो साहेब, जर मी चारचाकी वाहन चालवू शकते तर दुचाकी नाही का चालवू शकत?’ महिलेचे हे अजब उत्तर ऐकून पोलीसदादाची बोलती बंद झाली.
मी चावी देणार नाय...
आज (सोमवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास कुंभारवाड्यासमोर ट्रीपलसीट निघालेल्या दुचाकीला पोलिसांनी पकडले. तिघेही विद्यार्थी होते. पोलीसदादाने त्यांच्याकडे लायसन मागितले आणि गाडीची चावी काढून घेणार तोच एका मुलाने गडबडीने चावी काढून घेतली. त्यानंतर पोलीसदादाने त्या मुलाकडे चावी मागताच ‘मी चावी देणार नाय,’ असे उद्धटपणे बोलून तिघांनी धूम ठोकली. त्यानंतर हवालदाराने शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या मदतीने विनाचावीची ती गाडी वाहतूक शाखेत नेली.
नागरिकांमुळं झाली सुटका
भररस्त्यात सुरू असलेला प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. इतर वाहतूक पोलीसही तिथे आले. नागरिकांनी समजावल्यानंतर शंभर रुपयांचा दंड करून पोलिसांनी त्याला सोडून दिले.