अपंगांच्या प्रवासाला ‘शिक्क्यांचे’ अडथळे!
By admin | Published: October 14, 2015 10:20 PM2015-10-14T22:20:15+5:302015-10-15T00:31:23+5:30
एसटी कंडक्टरांचा अजब नियम : ओळखपत्र चालत नसल्याचा फतवा
सागर गुजर - सातारा -शासनाचे वाहन म्हणून सर्वसामान्यांसाठी आधार ठरणारी एसटी सध्या अपंगांवर नाराज झाल्याचे चित्र आहे. अपंगांना एसटी प्रवासात सवलत म्हणून देण्यात आलेले ओळखपत्र चालत नसल्याचा अलिखित फतवा काही वाहकांकडून काढला गेला आहे. या ओळखपत्रावर ‘कायमस्वरूपी’ हा शिक्का आणण्याचा अजब कारभार सुरू झाला आहे.
जिल्ह्यातील सुमारे ३२ हजार अपंग एसटीच्या सवलतीचा लाभ घेत आहे. अपंग असल्याचे प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सकांकडून मिळते. या आधारावर जिल्हा समाजकल्याण कार्यालयाकडून अपंगांना एक ओळखपत्र मिळते. अपंगत्व ४० टक्क्यांच्यावर असेल तर अशा अपंगांना एसटी प्रवासामध्ये ७५ टक्के सवलत मिळते.
१८ वर्षांवरील व्यक्तींसाठी हे कायमस्वरूपी ओळखपत्र असून १८ खाली व्यक्तींनी दर पाच वर्षांनी हे ओळखपत्र नवीन घ्यावेत, अशी अट आहे. त्याबाबतचा उल्लेख ओळखपत्रावर आहे.
सध्या मात्र शासनाच्या आदर्श सूचनांना हरताळ फासत ओळखपत्र कालबाह्य ठरविण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. अपंग एसटी प्रवासावेळी हे ओळखपत्र दाखवितात, तेव्हा अनेक वाहक ते नूतनीकरण करून आणा असे सांगतात.
याबाबत सातारा आगाराशी संपर्क साधला असता अपंगांच्या ओळखपत्रांवर शिक्के मारून दिले जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अपंग ओळखपत्रांवर शिक्के मारण्यासाठी अपंगांना धावपळ करत एसटी आगार गाठावे लागत आहे.
दिसला अपंग, काढ बसमधून बाहेर!
अपंग व्यक्ती प्रवास करताना दिसला की ओळखपत्र पाहून खाली उतरविण्याच्या सूचना अनेकवेळा केल्या जात आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब अपंगांवर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी संबंधित यंत्रणेने पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिक्क्याने मिटणार अडचणी
एसटी प्रशासनाच्या सूचनेनुसार अपंगांना मिळालेल्या ओळखपत्रांवर कायमस्वरूपी असा शिक्का मारण्यात येतो. एसटीच्या आगारात त्यांनी तो मारून घेतल्यास त्यांना प्रवासात सवलत मिळण्यात कोणतीच अडचण येणार नाही.
- नौशाद तांबोळी, आगारप्रमुख, सातारा.
नियम काय सांगतो...
केंद्र शासनाचे पत्र क्रमांक १६.२१/९७-१३ दि. १ आॅक्टोबर २००४ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार अपंग व्यक्तीस ओळखपत्र देणेबाबत आदेशित केले आहे.
१८ वर्षांवरील शारीरिकदृष्ट्या अपंगांना हे कायम ओळखपत्र देण्यात येत आहे.
१८ वर्षांखालील शारीरिकदृष्ट्या अपंगांनी दर पाच वर्षांनी ओळखपत्र नवीन घेण्यात यावे.
ओळखपत्र हरविल्यानंतर दुसरे नवीन ओळखपत्र काढण्याचा नवीन फॉर्म भरून सर्व कागदपत्रे व माहिती तसेच त्यासोबत शपथपत्र सादर करणे आवश्यक आहे.
हे ओळखपत्र अहस्तांतरणीय आहे, व ज्याच्या नावाने देण्यात आले आहे, त्याने ते ठेवावे व वापरावे.