फलटण : कोळकी, ता. फलटण येथील शिंगणापूर रस्त्यावरील सर्व्हे नंबर वीसमध्ये संगनमताने खोटे दस्तऐवज तयार करून प्लॉट विक्री सुरू आहे. याप्रकरणी दोषी महसूल अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून बडतर्फ करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजू काळे यांंनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
काळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोळकी येथील सर्व्हे नं. वीसचा फाळणीबारा अंमल देण्यासाठी संबंधित अधिकारी, तलाठी यांनी दिनांक ३ नोव्हेंबर २०२० रोजी मूळ सातबारा बंद न करता एकूण २२७ पोटहिस्से पाडलेले आहे. संबंधित फाळणी बाराची नोंद फेरफार १४,११० प्रमाणे केलेली आहे. फेरफारप्रमाणे राहुल मोहन देशमुख यांचा नावाचे एकून २२७ पोटहिस्सेचे सातबारा उतारे तयार करणे अपेक्षित होते; परंतु तसे न करता त्यांनी २२७ पोटहिस्से बोगस व्यक्तींच्या नावे सातबारा तयार केलेले आहेत. फेरफार १४,११० हा २४ डिसेंबर २०२० रोजी तयार केलेला आहे. त्यांनी फेरफार तयार होण्यापूर्वीच पोटहिस्सेचे सातबारा उतारे तयार केलेले आहेत. त्या सातबारा उतारा पाहून सबरजिस्टार फलटण यांनी खरेदी-विक्री दस्त केलेले आहेत यामध्ये तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी संबंधित अभिलेख चुकीच्या पद्धतीने तयार केलेले आहेत. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत व खरेदी - विक्रीचे दस्त ताबडतोब बंद करण्यात यावे.
बेकायदेशीर तयार केलेल्या सातबारा उताऱ्यावरून झालेले सर्व व्यवहार बेकायदेशीर असून, त्यांचा नोंदी रद्द करण्याचा आदेश देण्यात यावा. सातबारा उताऱ्यावर एका मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे एकूण दीड कोटी रुपये तारण गहाण खत केलेले आहे. गावकामगार तलाठी यांनी बोजाची नोंद सातबारा उताऱ्यावर जाणीवपूर्वक केलेली नाही. सातबारा उताऱ्यावरील नारायण शहाजी चव्हाण यांनी २९ ऑक्टोबर २०२० रोजी दस्त ३५३६/२०, दस्त ३५३७/२० प्रमाणे त्यांच्या हिश्श्याचे क्षेत्र हे. १.२० आर फाळणीबारा होण्यापूर्वीच विकलेले आहे. तलाठ्यांनी त्यांच्या नावाचे पोटहिस्से पाडून बोगस सातबारा तयार केलेला आहे. उपअधीक्षक भूमी अभिलेख फलटण यांनी १८ ऑक्टोबर २०२० रोजी मो. र. क्र. २७०१ प्रमाणे मोजणी करून आकारफोड पत्रक ए. एफ. नं. ४८६/२०२० ने तयार केलेले आहे त्याप्रमाणे फाळणीबारा व गटबुक तयार केलेले आहे. या प्रकरणात कोणत्याही कागदपत्रांचे अवलोकन न करता नियमबाह्य पद्धतीने कार्यवाही केलेली आहे व चुकीच्या पद्धतीने फाळणीबारा तयार करून त्याप्रमाणे सातबारा तयार करून आर्थिक लाभ घेण्याचा आहे. कार्यवाही केलेली आहे. संपूर्ण प्रकरण हे बोगस असून, या प्रकरणात अनेक त्रुटी आहेत, असेही निवेदनात काळे यांंनी म्हटले आहे.
चौकट
कोळकी येथील सर्व्हे नंबर वीस संदर्भात माझ्याकडे तक्रार आली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने कागदपत्रांची पाहणी करून योग्य ती चौकशी केली जाईल.
- समीर यादव,
तहसीलदार